Tuesday, 14 June 2016

शाळेचा पहिला दिवस (सुट्टी नंतरचा)


   वार्षीक परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्यानंतर शाळेचं दफ्तर उन्हाळ्याची सुट्टी संपुन शाळा सुरु होई पर्यंत ते कुठं आहे? याकडं कधीचं लक्ष द्यायचो नाही. मग शाळा सुरु व्हायच्या अगोदर दोन दिवस शाळेला लागणार्या सर्व साहीत्याची शोधाशोध करायला लागायचो. तेव्हा ते दफ्तर शोधायला घर उलथं पालथं घालायचो. 
     त्यावेळी स्कुल बॅग नावाचा प्रकार माहीतचं नव्हता. वह्या पुस्तकं ठेवायला नायलॉनची पिशवी असायची. खालच्या कोपर्यात फाटलेली. कधी एक बंद तुटलाचं तर दुसर्या बंदाला गाठ मारायची आणि दर रवीवारी तिचं पिशवी बाजाराला उपयोगी पडायची. मागच्या वर्षीच्या वह्यातली कोरी पानं बाजूला काढायची. सारी पानं एकत्र करुन शिवायची. कशी बशी एखादी वही तयार व्हायची. घरच्यांना वह्या पुस्तकांचा खर्च पेलणारा नसायचा म्हणून पुढच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्याकडून निम्या किमतीत त्यांच्या गाईड सहीत सर्व पुस्तकं खरेदी करायचो. एक डझंन वह्यांच्या किमती बघून अर्धा डझन वह्यावरचं वर्षभर काढायचं. वहीच्या मधोमध एक पान फोल्ड करुन एका वहित दोन विषयाचं लिखान करायचो. एक कंपास पेटी तिन चार वर्ष वापरायचो. जोपर्यंत तीला गंज लागतं नाही. तिचं टोपनं निखळतं नाही. तोवर ती शाळेच्या पिशवीत तशीचं पडून असायची. आठ रुपयाचा नवा पेन घेता येत नव्हता. म्हणून आठ आण्याची शिस पेनात टाकून तो वापरायचो. कंपास पेटीतल्या पंट्टीवरचे आकडे पुसले जायचे, पट्टी मधून तुटली जायची तरीही ती वापरायचो. पेन्सिल शेवटच्या टोकापर्यत आणि शार्पनरचं ब्लेड गंजे पर्यंत ते तसचं कंपास पेटीत असायचं. कर्कटक वापरुन दोन ठिकानी वाकलेला असायचा. कंपास पेटीत दरवर्षी बदलायचा तो फक्त वेळापत्रकाचा कागद. जुनाचं निळ घातलेला पांढरा शर्ट, खाकी चंड्डी फाटलेली असेल तर ती शिवून घालायची. आई या शर्टला इतकी निळ घालायची, तो पाढरा आहे की निळा आहे हेच कळायचं नाही. हाच माझा शाळेचा युनिफॉर्म धुवून आणि कधीतरी कोळश्याची इस्त्री फिरवून पुन्हा पुन्हा वापरायचो.
    ही सारी तयारी करुन शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जायला खुप मजा यायची. जूनच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात शाळा सुरु व्हायची. तेंव्हा पावसाचं आगमन ही झालेलं असायचं. पाऊस चालू असायचा. घरी एकचं छत्री असल्यानं ती माझ्या वाट्याला कधीचं यायची नाही. म्हणून पावसाळ्यात शाळेला जाताना पाठीवर दफ्तर आणि डोक्यावर खताच्या पोत्याची खोप असायची. ती डोकं आणि दप्तरातल्या वह्या पुस्तकाला पाण्याचा एक थेंब ही लागू द्यायची नाही. म्हणून छत्री एैवजी पोत्याची खोपचं चांगली वाटायची.
  स्कुल शुज नावाचा प्रकार आता आता समजायला लागलाय. त्यावेळी आमच्या पायात विस पंचवीस रुपयाची पॅरागॉन तर कधी नॅशनल स्लिपर असायची. स्लिपरने पावसात शाळेला जाताना पाठीमागे शर्टापर्यंत चिखल्या उडलेल्या असायच्या. तसाच जाऊन शाळेत बसायचो. पाठीवरच्या चिखलाच्या ठिपक्या कुणाला दिसु नये, म्हणून सर्वात शेवटी बसायचो. पहिल्या दिवशी सर्वांचा नवा शर्ट आणि चड्डी दिसायची. वर्गातली मुलं आपली नविन वह्या पुस्तक एकमेकांना दाखवायची. नवी रंगबेरंगी कंपासपेटी दाखवायची. कलरफ्फुल पेन, पेन्सील दाखवायचे. कंपासपेटीतलं सारं साहीत्य काढून दाखवायचे. पण आम्ही काहीजन जुनीचं वह्या पुस्तक आणि साहीत्य वापरायचो. त्यामुळं आम्हाला त्यांच्याकडे बघतचं बसायला लागतं होतं. पण हे सारं तीथेचं विसरायचो. कारण ह्या वेळीच पाऊसाला सुरुवात झालेली असायची. उन्हानं तापलेल्या मातीवर पहिला पाऊस पडला की मातीचा सुगंध आणि वर्गातल्या नव्या वह्या पुस्तकांचा वास वर्गभर दरवळायचा. हा सुगंध दरवर्षी हवाहवासा वाटायचा. 
   त्यावेळी मनात कुठतरी खुपायचं. या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी शाळेच्या ड्रेस सहित सर्व साहीत्य नवं मिळेल. अस दरवर्षी वाटायचं. पण त्याचा हट्ट घरी कधीचं करतं नसायचो. कारण ही तसचं असायचं. हट्ट केलाचं तर तो पुर्ण होणारा नसायचा. मग हट्ट करायचाच कशाला? म्हणून जे आहे त्याच्यावर समाधान मानायचो. खरतर आजपर्यंत याचा माझ्या रोजच्या जगण्यात खुपचं उपयोग झालाय असं वाटतयं.
  
                 के.प्रफुल्ल

Sunday, 15 May 2016

सैराट

 सैराट चित्रपटावर काहीच बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण अस्वस्थ झालोय म्हणून पुन्हा लिहायचं ठरवलं.ही चित्रपटाची समीक्षा नाहीय बरं. 
  खरतर भारतीय चित्रपट रसीक चित्रपट केवळ मनोरंजनासाठीच पाहतात. दिग्दर्शकाला काय म्हणायच आहे. काय सांगायच आहे. या नजरेन हे चित्रपट कधीच पाहतं नाहीत. 'हा सिन बरोबर नव्हता तो असा हवा होता'. असा मेकिंगच्या दृष्टीने विचार करतात आणि इथच घोळ करुन बसतात. पण दिग्दर्शकाने तो सिन तसाचं का घेतला असावा याचा विचार फारस कोण करतं नाहीत असो.
   सैराट चित्रपटावर बोलायचं म्हणजे नेमक कशावर बोलायचं Direction, Story, Music, Cinematography का या चित्रपटात सहज साकारलेल्या पात्रांबद्दल. सांर काही अद्भूत आहे. ह्या चित्रपटातलं कथानक खेड्यातली प्रेमकथा आहे. मग या चित्रपटाचा बाज ही खेड्यातलाचं असणारं. हा चित्रपट पाहतं असताना कॉलेज जीवनात आवडणारी मुलगी, तिच्यावर होणारं प्रेम, तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मित्रांकडून होणारी मदत हे प्रत्येकजण स्वत:शी रिलेट केल्याशिवाय राहतं नाही. खरं तर प्रेमाला कसलचं बंधन नाही. ना जाती धर्माचं, ना वयाचं.  प्रेम हे स्त्री आणि पुरुष या दोनचं जाती मध्ये होतं. हेच वास्तव नागराज मंजुळे यांनी सैराट या चित्रपटात मांडलयं.
     चित्रपट प्रदर्शीत होण्या अगोदरचं रिंकू राजगुरु म्हणजे आर्चीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटात साकारलेली आर्ची पाटलाची मुलगी असल्यानं तिच्यातल्या पाटीलकीचा अॅटीट्यूड शेवटच्या सिन पर्यंत जसाच्या तसां आहे. घोडा चालवनं, मुलांना विहीरीतुन बाहेर काढून उड्या मारणं, पोहणं, बुलेट घेऊन कॉलेजला जानं, मंग्याला धमकावन, ट्रॅक्टर घेऊन शेतावरं जानं, परश्याच्या आईला आत्या म्हणनं,  रस्त्यावर नाचंन, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केलेला कागद पोलिसांसमोर फाडनं, घरच्यांवर बंदूक चालवनं, परश्याला पळवून नेन्यापर्यंत एकुणचं चित्रपटातं उत्तम पात्र तीन साकारलयं. खरतरं रिंकुने नागराजच्या आर्ची या पात्राला खरचं न्याय दिला असं म्हणावं लागेलं. आर्ची बरोबर परश्या (आकाश ठोसर) 
परश्याचे मित्र लंगड्या उर्फ प्रदिप बनसोडे (तानाजी गलगुंडे), सल्या (अरबाज शेख), आणि आर्चीची मैत्रीण आनी (अनुजा मुळे) या ही पात्रांनी उत्कृष्ठ अभिनय साकारला आहे. 
     खालच्या जातीचा परश्या (भारतात असलेल्या जातीव्यवस्थेवरुन) वरच्या जातीच्या आर्चीवर प्रेम करतो. जेवढं प्रेम परश्या आर्ची वर करतो तेवढचं प्रेम आर्ची ही परश्यावर करते. हे जेव्हा आर्चीच्या घरी समजतं तेंव्हा आर्चीचे वडील तात्या, आर्चीचा भाऊ प्रिंन्स आर्चीला तर मारतातच आणि परश्याला मारून 'गाव सोडून जा नाहीतर कापून उसात फेकून देईन' असं परश्याच्या कुटुंबाला धमकावतात. इथचं भारतात असलेल्या विषमतेच दर्शन घडतं. पण भारतात गाव खेड्यापासून चालतं आलेली ही विषमता नवी नाहीय. पूर्वी ही असचं घडत होतं आणि आज ही असचं घडतय. पण त्याच्याकडे कोनचं लक्ष देत नाही. 
   परश्याचा बाप परश्याला करमाळ्याला पाठवतो. दोन जीव एकमेकांपासून वेगळे होतात. परश्या आर्चीसाठी झुरत असतो. तिकडे आर्चीसाठी स्थळ ही बोलवलेलं असतं. घरच्या त्रासाला कंटाळलेल्या आणि पारश्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आर्चीला परश्याचा जिवलग मित्र लंगड्या (प्रदीप) घेऊन येतो आणि तिथून हे दोन जीव एकमेकांची सोबत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोडतं नाहीत. शेवटची दोन मिनिटं विदाऊट sound आणि लहान तात्याचे रक्ताने माखलेल्या पावलाचे ठसे काळजाचा थरकाप उडवतात. का केला असेल बर तो आवाज म्युट? का दिलं नसेल Background music? ज्या चिमुकल्याला जात काय आहे? हे माहीत ही नसताना. रक्ताने बरबटलेल्या आई वडीलांना पाहुनं त्याच्या रडण्याचा आवाज का येतं नव्हता?  त्या चिमुकल्याची किंचाळी का एैकू आली नाही? ही दोन मिनीटं थेटर सुन्न का झालं होतं?  पाहणार्यांचा श्वास का रोखला गेलेला होता? हे सार आठवल तरी आज ही मन अस्वस्थ होतयं. 
   सभोवताली हे सार घडतं असताना. सैराटला काही स्वयंघोषित संस्कृती रक्षक लोक आणि संघटना विशिष्ट एका जातीच्या चैकटीत बघतात. पाटलांच नाव वापरुन मराठा समाजाला बदनाम केलं आहे. असं त्यांच म्हणनं आहे. खर तर यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते. या संपुर्ण चित्रपटात कोणतीचं जात अधोरेखीत केलेली नाहीय. तर भारतात असलेल्या जातीभेदावर भाष्य केलं गेलयं. मग भारतात अश्या ऑनर किलींगच्या घटना घडल्या नाहीत का? सोनई हत्याकांडामध्ये वरच्या जातीच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून त्या मुलाचे तुकडे करुन मारलं. नगर जिल्ह्यातल्या खर्डा या ठिकाणी दगड फोडणार्याचा अल्पवयीन मुलगा गावातल्या सवर्ण मुलीवर प्रेम करतोय म्हणून त्याला मारुन फासावर लटकवलं. काही महिण्यांपुर्वी कोल्हापुर मध्ये एका ब्राम्हणाच्या मुलाने पाटलाच्या मुलिशी लग्न केलं म्हणून त्या दोघांचा ही खुन केला. जे समाज्याचं वास्तव आहे ते चित्रपटारुपी समोर आनलं तर आता त्याला ही विरोध करतायतं. 
    जर खरचं आर्ची ने परश्यावर असलेल्या प्रेमा बद्दल तिच्या घरी सांगीतलं असतं तर? 
तीच्या प्रेमाला तिच्या घरच्यांनी सहमती दिली असती का? 
आर्ची आणि परश्या यांच्या लग्नाला परवानगी दिली असती का? 
जर दिली नसती तर काय केलं असतं? 
जर परश्याशी लग्न लाउन दिलं असतं तर जातपंचायतीसमोर परश्याच्या वडिलांना थोबाडीत मारुन घेण्याची गरज पडली असती का? 
प्रेमात जीव देण्यात काहीच शहानपणा नाही. पण तुमची संस्कृती, तुमचा समाज, तुमचे विचार खालच्या जातीच्या परश्याने वरच्या जातीच्या आर्चीशी केलेलं लग्न तुंम्ही मान्य का करु शकतं नाही?
यासारखे बरेच सारे प्रश्न मला पडतायतं. कदाचीत तुम्हालाही पडतं असतील. जर पडतं नसतील तर तुम्ही जिवंत नाही आहात. 
        
                     - के.प्रफुल्ल



Sunday, 8 May 2016

125 वी जयंती

बाबासाहेबांची जयंती आता थोड्याच दिवसावर येऊन ठेपलीय. जयंतीची तयारी आता जगभरात सर्वत्र चालू आहे. 125 वा बाबासाहेबांचा जन्मदिवस केंद्र सरकार ही समतेचे वर्ष म्हणून देशभर साजरं करतय.
      बाबासाहेबांना मुर्ती पुजा मांन्य नव्हती. त्यांचा मुर्ती पुजेला विरोध होता. तरीही आम्हीच त्यांच्या मुर्तीची पुजा करतोय. पुतळ्या पासुन फोटोच्या फ्रेम पर्यंत आणि किल्लीच्या किचन पासुन गळ्यातल्या लॉकेट पर्यंत आम्हीच त्यांना कैद केलय. बंद केलयं. बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी, म्हणून त्यांनी आम्हाला गुलामगीरीतुन मुक्त केलं नाही. त्यांचा जयजयकार व्हावा, म्हणून त्यांनी आमच्या गळ्यातलं लोटकं आणि कंबरेचा झाडू काढला नाही. त्यांची मिरवणूक निघावी, म्हणून त्यांनी आम्हाला जनावरातून माणसात आणलं नाही. तर आम्हाला सर्व जाती धर्माप्रमाणे समाणतेची वागणूक मिळावी. खर्या अर्थानं आम्ही माणूस म्हणून जगावं. यासाठी त्यांनी दिवस रात्र संघर्ष केला. हजारो संसार उभारण्यासाठी स्व:ताच्या संसाराकडे उभ्या आयुष्यात त्यांना लक्ष देता नाही आलं. आम्हाला माणूस बनवण्यासाठी त्यांनी निस्वार्थीपणे मनुवाद्यांशी संघर्ष केला. एवढा त्याग त्यांनी सहन केला. ते केवळ त्यांची जयंती साजरी करण्यासाठी नाही. आणि आज ही आम्ही तेच करत आलोय.
     बाबासाहेबांचे विचार आम्ही कधीच आत्मसात केले नाही. त्या काळच्या शाहीरांनी आणि जलसा कारांनी सांस्कृतीक चळवळीतून त्यांचे विचार शहरात, खेडोपाडी, वस्त्या-वस्त्यात घरा-घरात पोहचवले. आज त्यांच्या जयंतीला DJ वाजवला जातो. मिरवनुकीपुढे नाचलं जातं. पण DJ वाजवून आणि नाचून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचनार का? शेतात भर उन्हात राबनारी माऊली या जयंतीला चार पाचशे रुपये वर्गणी न चुकता देते. एसी ऑफिसमध्ये बसनारा आमचा साहेब ही पाचशे हजार रुपये वर्गणी देतो. आणि आम्ही त्या पैशाची धुळंदान करतो. बाबासाहेबांच्या जयंतीला आणि मिरवणूकीला पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. तोच पैसा समाजातल्या गरीब हुशार मुलांच्या शिक्षण उच्चशिक्षणासाठी खर्च केला, वस्त्यांमध्ये ग्रंथालयांची उभारणी केली, शैक्षणीक संस्था उभारल्या तरच बाबासाहेबांच कार्य पुर्णत्वास जाईल. पण जर का मी असं जयंती मंडळाला बोललो. तर जयंतीला विरोध करतोस म्हणून मलाच विरोधक समजतील. मग तुमच्या विचारांचा वारसा आम्ही कसा पुढे नेणार?
      बाबासाहेबांची जयंती जर साजरी करायचीच असेल, तर त्यांच्या विचारांची जयंती साजरी केली पाहीजे. त्याचे विचार समाज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचवले पाहीजे. तरच बाबासाहेबांना अपेक्षीत असणारा भारत घडू शकेल. गरीबी आणि दारीद्र मुळे आजचा तरुण व्यसनाधीन बनत चालला आहे. अजून ही समाजात शिक्षणाला फारसं महत्व दिल जातं नाही. शिक्षणापासुन वंचित असलेल्या घटकाला त्याच्या हक्काचं शिक्षण मिळवून दिल पाहीजे.
    भारतातल्या सर्व स्त्रीयांना पुरुषांबरोबर समान वागणूक, समान अधीकार मिळावा अशी तरतूद बाबासाहेबांनी घटनेत केलेली आहे. पण स्त्रीयांनी समाजात चाललेल्या कोणत्याच कार्यक्रमात सहभाग घेऊ नये, म्हणून त्यांच चाललेलं काम बंध कसं पाडता येईल याचा विचार आपनं प्रत्येकजन करतोय. जर बाबासाहेबांनी केलेल्या कायद्याचे पालनं आम्हीच करत नसेल तर या देशातले राजकारणी, राजकीय पक्ष, भारतातले हे लोक या घटनेचे पालन कसे करतील. आपण त्या स्त्रीयांना त्याचा अधीकार केंव्हा देणार.
माझ्या गावात जयंतीनीम्मीत स्त्रीयांनी तुमच्या (बाबासाहेबांच्या) विचारांची चळवळ सुरु केलीय. पण आम्हीच त्या स्त्रीयांना मागे ओढतोय. त्या स्त्रीयांना आमचेच शिक्षीत आणि अशिक्षीत कार्यकर्ते विरोध करतायतं. तसही राज्यघटना सुपुर्द करताना तुंम्ही तुमच्या शेवटच्या भाषणात बोलले वाक्य मला आज ही आठवतय. घटना किती ही चांगली असो या घटनेचे पालन कर्ते जर निट नसतील तर ती घटना बिनकामाची आहे. आणि घटना कितीही वाईट असो या घटनेचे पालन कर्ते लोक जर व्यवस्थीत, काटेकोर पणे पालन करतील तर तिच घटना खुप काळ टिगते.
बाबासाहेब म्हणाले होते की, या देशात न्याय मागुन मिळतं नाही तर तो मिळवावा लागतो. समाजाचा सर्वांगीन विकास करायचा असेल तर राजकीय सत्तेत गेल्या शिवाय पर्याय नाही असे म्हणून त्यांनी आम्हाला शासनकर्ती जमात बनायला सांगीतलं होतं. पण आज ही आंम्ही गावापासुन दिल्लीपर्यंत राजकारण्यांच्या दावणीला बांधले गेलेलो आहे. आम्ही त्याच्याचं पायाखालची धुळ चाटतो आहे.
   
    पण बाबा, एक दिवस येणार आणि तुमच्या विचाराचा आणि विचारांचाच वारसा अंखड चालू राहणार.
                               के.प्रफुल्ल

Friday, 6 May 2016

धगधगती रात्र...

राती दिड ला एडीटींगच काम संपवून पडलो होतो. झोप लागतं नसल्यानं या अगांवरुन त्या अंगावर होऊन झोपण्याचा प्रयत्न करत होतो. रुम मध्ये लाईट बंद केली असल्यानं अंधार पसरला होता. मंध्य रात्र असल्यानं तेवढीच शांतता होती. रुम मध्ये आणखी एकजण मोबाईलवर फिल्म बघत होता. त्याला काहीतरी जळल्याचा वास येऊ लागलां. तो फिल्म बघायचं थांबवून वास कुठून येतोय हे पाहू लागला. खिडकिच्या बाजूला झोपतं असल्यानं तो उठताच त्याच लक्ष खिडकीतं गेलं. तो घाबरला. रुम मधले बारा जण होते. उद्या ऑफिस असल्यानं सगळेच गाढं झोपले होते. तो  त्याच्या बाजूला झोपलेल्या मित्रांना उठवू लागलां. ते खिडकित बघू लागले. त्यांच्या घाबरण्याची चाहूल येव्हाना मला ही लागली होती. मी ही काय झालं म्हणतं खिडकीकडे जाऊ लागलो. खिडीकीतून बघून मी ही घाबरलो. वेळ होती रात्री दोन ची. रुमच्या समोर चौकटी पासुन दहा फुट अंतरावर भिंत होती. त्या भिंतीवर सोसायटीतल्या दहा घरांच्या लाईट मिटरची पेटी होती. त्या पेटीत आग लागली होती. सगळे रुमच्या बाहेर पळू लागले. झोपलेले बाराजन  आता उठले होते. शेजार्यांना उठवू लागले. "आग लागली, आग लागली" म्हणतं रुममधल्या सगळ्यांनी आख्खी सोसायटी जागी केली. आग वाढतं होती. सोसायटीतले पुरुष बाहेर पडले कोणी बनियन, चड्डी तर कोणी टॉवेल वर बाहेर आले. ज्यांच्या मोटारसायकली होत्या त्यांनी सुरक्षीत ठिकाणी हालवल्या. महिला आगीकडे बघून घाबरल्या होत्या. लहान मुलांना घेऊन सोसायटीच्या बाहेर रस्त्याकडे पळतं होत्या.आगीचा जोर वाढतचं होता. प्रत्येकजन आपण सुरक्षीत ठिकाणी कसे जाता येईल हे पहात होता. आम्ही मात्र त्या आगीकडे बघतं होतो. काय करायचं काहीचं कळतं नव्हतं. लाईट असल्यानं पाणी ओतून आगं विझवू शकतं नव्हतो. कोणी तरी म्हटलं सोसायटीच्या मेन गेटवर डिपी आहे. तो बंद केला तर आग आटोक्यात येईल. मी आणि रुम मधले मित्र त्या डिपीकडे धावतं गेलो. डिपी उघडला. फ्यूज काढायला कोणचं तयार नव्हतं. आरे काढ नां असा आवाज मला एैकू येत होता. ते मलाचं फ्यूज काढायला सांगत होते. फ्यूज काढायला कोणचं तयार नव्हतं. एका पेटी मध्ये आग लागली होती. आणि दुसरीकडे मी दुसर्या पेटीत फ्यूजला हात लावू का नको याला घाबरत होतो. घाबरतं धाडसं केलचं. डिपीत असणार्या तिन्ही फ्यूज काढल्या. आता सोसायटीतले तरुण फोन लावू लागले. कोणी 100 नंबर वर पोलीस स्टेशनला तर कोणी 107 नंबरला फायरब्रिगेडला. त्यानी पोलीसांना कळवलं. फायरब्रिगेडचा संपर्क होतं नव्हता. फ्यूज काढून ही आग आता खुपच वाढली होती. दिवाळीत जसे आकाशात कलरफुल्ल फटाके फुटतात तसे मीटर फटाफट फुटत होते. रुम मधले सगळेच घाबरले होते. कारण आमची रुम आगीच्या समोर आणि दहा फुटावर होती. बाहेरच्या वलानीला कपडे सुखायला टाकले होते. आगीचा लोळ कपड्यांना लागून दगा फटका रुमला होतो की काय? अस मनोमन वाटतं होतं. काय करायचं काहीच कळतं नव्हतं. डोक्यात राख पडल्यासारखं झालं होतं. बरेच लोक मातीने विझवा असं म्हणत होते. पण मुंबईसारख्या शहरात जमीन दिसनं मुश्किल. तर माती कुठून आणनार. माती पाहण्यासाठी तिघे चौघे पळत होते. आगीनं आता भयान रुप घेतलं होतं. पेटीच्या आत लागलेली आग आता घराच्या पत्र्यापर्यंत पोहचली होती. माती बघायला बाहेर गेलेल्यांनी वाळू आणली. विस पंचवीस फुटाच्या अंतरावरुन आगीवर वाळूचा मारा करु लागले. वाळू थोडीशी ओली असल्यानं आग आटोक्यात येतं होती. पंधरा विस मिनीटाच्या प्रयत्नाने आग विझली. आणि सोसायटीतल्या सगळ्यांचाच जिव भांड्यात पडला. सिनेमात घडतं अगदि तसं आग विझल्यावर पोलीस आणि फायरब्रिगेडचे जवान घटनास्थळी तीन वाजता पोहचले. संपुर्ण सोसायटीची झोप उडली होती. स्त्रीया लहान मुलालांना घेऊन सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर बसल्या होत्या. आगीचं हे भयान रुप पाहून आग विझवली तरीही, घरात जायला कोणी तयार नव्हतं. मिटरच्या पेटीला लागलेली आग आपल्या घरापर्यंत आली असती आणि आपण झोपलोच असतो तर? आपल्याला उठवलचं नसतं तर? या चिंतेत सोसायटीतल्या सार्यांनीच रात्र काढली असावी.
                                                                                                                              के.प्रफुल्ल

Wednesday, 6 April 2016

रंगा पतंगा

माणूस आणि प्राणी यांचे नातेसंबध सागंणारा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्ठीला नवा नाहीय.
 भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातल्या बर्याच ठिकाणी पारंपारिक पध्दतीने शेती केली जाते. शेतीेेच्या मशागतीसाठी आजही बैल जोडीचा वापर केला जातो. म्हणून शेतकरी आणि बैल हे एक अतूट समीकरण बनलयं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसाद नामजोशी याचा नुकताच प्रदर्शीत झालेला रंगा पतंगा.
     रगा पतंगा ही नावं एैकुण कोणत्या तरी व्यक्तीची असावीत अस वाटनं सहाजीक आहे. पण रंगा पतंगा हे नाव व्यक्तीच नसुन ते एका बैलाच्या जोडीचं आहे. विदर्भातल्या जूम्मन म्हणजे मकरंद अनासपुरे या मुस्लिम शेतकर्याची बैल जोडी अचानक रात्रीत गायब होते. बैलं शोधण्यासाठी जूम्मन आणि त्याचा मित्र पोपट म्हणजे संदिप पाठक यांनी केलेला प्रवास या सिनेमात चित्रीत केला आहे.
      एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. जनावरांना चारा मिळतं नसल्यानं शेतकरी जनावर खाटीकाला विकताेय. तर दुसरीकडं स्व:ताच्या मुलासारखा सांभाळ केलेले बैल अचानक गायब होतात. हरवलेले बैल कुठे शोधावेत. यासाठी जुम्मन पोलीस स्टेशन मध्ये कंम्प्लेंट करायला जातो. हरवलेली माणसं सापडतं नाहीत, तर तुझी बैलं कुठ सापडणार असं बोलून जूम्मनला पोलिस स्टेशन मधून हाकलून दिल जातं. पोपटच्या सांगण्यावरुन जूंम्मन बैल शोधण्यासाठी जोशी बुवांकडे ज्योतीषी पहायला जातो. आणि एकविसाव्या शतकात असलेली अंधश्रध्दा अजून ही खेड्या पाड्यात तशीच आहे असं दिसुन येतं. जोशी बुवांच्या सांगण्यावरुन जूंम्मन आणि पोपट बैलांचा शोध घेतं असताना.  जूम्मन मुस्लिम तर त्याचे बैल ही मुस्लिमचं. जोशी बुव्वा जुम्मनचे बैलं कुठ आहेत हे कसे काय सांगू शकतील? असा प्रश्न एक वाटाड्या उपस्थित करतो. गाईचा धर्म दुध दे‌नं आणि शेतात काबाड कष्ट करनं हा बैलाचा धर्म. त्याला तर सुखांन जगू द्या. जूंम्मन ने दिलेल हे उत्तर सध्या चाललेल्या  हिंदू मुस्लिम गो हत्या वादाला मार्मिक म्हणायला काहीच हरकत नाही.
     बैलाची शोधाशोध सुरु असतानाच दुष्काळाची न्यूज कवर करण्यासाठी सिनेमात इलेक्ट्रॉनिक मिडीयांची इंट्री अगदी सहज होते. पोपट जूम्मनची बैलं गायब झाल्याची घटना पत्रकारांना सांगतो. आणि तिथून जूंम्मनचे बैल गायब झाल्याची घटना मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहचते. आता मिडीया ही जूम्मनचे रगा पतंगा शोधण्यासाठी पुढे आलीय. जूम्मनचे बैल गायब झाल्याची घटना नवी नाहीय तर या आधी बरेच बैल गायब होण्याच्या घटना विदर्भात जघडल्या आहेत अस समोर येतं. शेवटच्या टप्यात हैद्राबादला कत्तलीसाठी जाणारा बैलांनी भरलेला ट्रक पोलीसांना सापडतो. आणि बैल गायब होण्याचा छडा लागतो. बैलाने भरलेला ट्रक पाहून जूम्मन सुखावतो. त्याचे रंगा पतंगा या ट्रक मध्ये असतील याचा आनंद त्याच्या चेहर्यावर जाणवतो. पण हा आनंद क्षणीक असतो. कारण जूम्मनचे रंगा पतंगा या ट्रक मध्ये नसतात. हैद्राबादला बैल कंत्तलीसाठी जातात. हे एैकल्यावरचं जूंम्मन खचून जातो. आपल्या रंगा पतंगाच काय झालं असेल? कुठ असतील रंगा पतंगा? या विचारात आडकतो. आणि स्व:ता रंगा पतंगाचा शोध हैद्राबादला जायला निघतो. हैद्राबादला निघाल्यावर जूम्मंन वाटेत एका टपरीवर चहासाठी थांबतो. त्यावेळी एका ट्रक ड्रायव्हरचं त्याच्या सोबतीशी चाललेल बोलनं एैकतो. तो ट्रक हैद्राबादला निघालेला असतो. त्यामध्ये जनावर आहे हे समजताच जूंम्मन समोर उभा असलेल्या ट्रक मध्ये बघतो, तर त्याला त्याचे रंगा पतंगा दिसतात. आणि रंगा पतंगाला शोधण्याचा प्रवास इथचं थांबतो. शेवटच्या सिन मध्ये हरवलेले रंगा पतंगा सापडल्यावर जूम्मनच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. तर पंत्रकार अभय महाजनच्या चेहर्यावर केलेल्या कामाचं समाधान  मिळाल्याचं दिसुन येतं.
     एकूणच रंगा पतंगाला पाहण्यासाठी संपुर्ण चित्रपट शेवट पर्यंत खेळवून ठेवतो.
    मकरंद अनासपुरे आणि संदिप पाठक यांची मुख्य भुमिका असलेल्या या सिनेमात नंदिता धुरी, सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे, गौरी कोंगे, अभय महाजन, हार्दीक जोशी यांच्याही महत्वाच्या भुमीका आहेत. आणि त्यांच काम ही कौतुकास्पद आहे. या सिनेमातलं संगीत सिनेमाला सोबर असं आहे. आदर्श शिंदे यानी गझलं पहिल्यांदा जरी म्हटली असली तरीही तशी वाटतं नाहीय. पुन्हा पुन्हा सिनेमात हवी हवीशी वाटते.
   ये सनम आखों को मेरी खुबसुरत साज दे.
   येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे.
                           के.प्रफुल्ल

Thursday, 11 February 2016

ती

ग्रॅज्यूएशनसाठी भिलवडीच्या चितळे महाविद्यालयात अॅडमिशन घेतल होत. FY ला कस बस एटी केटी मिळवून SY ला गेलो. डान्स ग्रुप मुळे भिलवडी बरोबर भिलवडी परीसरात जवळजवळ सगळ्यांना परिचीत झालो होतो. ग्रॅज्यूएशनच्या पहिल्या वर्षी युथ फेस्टीवल मध्ये डान्स परफॉर्म केला होता. तो खुप सुरेख झाला होता. कॉलेजच्या प्राचार्यांनपासुन पीयून पर्यंत सगळ्यांना आवडलेला होता. त्यामुळे दुसर्याही वर्षी युथ फेस्टीवल मध्ये सहभाही होण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी पुन्हा आम्ही सहभागी झालो. ते फेस्टीव्हल कडेगाव ला होत. तो ही परफॉर्म चांगला झाला. कडेगाव हून येताना चहासाठी पलूसला गाडी थांबवली. एका हॉटेल मध्ये सर्व मुलं मुली आम्ही एकत्र बसलो. त्यात एक मुलगी अतिशय सुंदर जीला मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. तीची विचारपुस केली असता तीने ही मला पहिल्यांदाच पाहिल्याचं सांगीतल. बोलता बोलता हे पण बोलली की मी ग्रॅज्यूएशनच्या दुसर्या वर्गात शिकते. मी पण दुसर्याच वर्गात शिकत होतो पण वर्ग खोलीचा आणि माझा दोन वर्षात फक्त परिक्षेलाच संबंध येत होता. त्यामुळे आम्ही एका वर्गातले असुन एकमेकाला पाहिलं नव्हतं. दुसर्या दिवसापासुन मला कॉलेजला जायला कारण मिळाल होतं. मी कॉलेजला जाऊन लेक्चरला बसु लागलो. महिणा भर रेग्युलर कॉलेजला जाऊन दिवसातला एक क्षण तीच्या सोबत घालवू लागलो.
       प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा आणि अविस्मरणीय दिवस म्हणजे वाढदिवस. असाचं एक आनंदाचा दिवस म्हणजे तीचा वाढदिवस आणि माझा ही आनंदाचा दिवस. माझा तीन दिवसा नंतर बर्थडे आहे. अस तीने मला सांगीतलं. त्यावेळी आमच्या कॉलेजचा एन.एस.एस कँम्प भिलवडीच्या शेजारच्याच गावी होता. मी पहिल्यांदाच एन.एस.एस कँम्प मध्ये सहभागी झालो होतो. स्वच्छतेचं काम चांगल्या प्रकारे चालू होतं. तीचा वाढदिवस दोन दिवसावर आला होता. मी तीला वाढदिवसाच गिफ्ट द्यायच ठरवलं. वाढदिवसाच्या अधल्या दिवशी मी आणि माझा मित्र शंभर रुपयाच पेट्रोल भरुनं सांगलीला गिफ्ट आणायला गेलो. सीटी मॉल पासुन बीग बझार पर्यंत आणि आर्चीस गॅलरी पासुन डी मार्ट पर्यंत सर्व दुकानं पिंजून काढली. पण गिफ्ट आवडत नव्हतं. जर आवडलचं तर ते खिश्याला परवडनारं नव्हतं. गिफ्ट पहिल्यांदा कोणत्यातरी मुलीला देतं असल्यानं ते काय द्यायचं हे काहीच कळत नव्हतं.
एवढ्या ठिकाणी शोधून झाल्यावर झी बझार मध्ये मला माझ्या खिश्याला परवडनारं अस गिफ्ट मिळालं. दुसर्या दिवशी ते गिफ्ट घेऊन मी एन.एस.एस कॅम्प मंध्ये आलो. गीफ्ट दिल्यावर ती घेईल का? काय बोलेल का? काय करेल का? अस मीच मला विचारत होतो. शेवटी द्यायच ठरवलं. पण समोरा समोर नाही. सारे विद्यार्थी स्वच्छतेला गेले असता हळूचं घाबरत,थरथरत ते गिफ्ट तीच्या बॅग मंध्ये ठेवलं. आता तर खुपच भिती वाटू लागली. कॅम्प मध्ये तीन वाजता व्याख्यान असल्यानं ती कार्यक्रमाच सुत्रसंचलन करणार होती. त्यासाठी बॅग घेऊन तीच्या एका मैत्रीणी सोबत चालली. मी लांबूनच पाहिलं होतं. फोनवर बोलण्याच नाटक करत तीच्या पाठीमागे गेलो. तीला आवाज दिला आणि तीला सांगीतलं. तुझ्या वाढदिवसाच गिफ्ट तुझ्या बॅग मध्ये आहे. तू घरी जाऊन बघ. कोण सोबत असताना पाहू नको. मैत्रीणींना सांगू नको. ती हसून हो म्हणाली आणि कार्यक्रमाकडे निघाली. येवढ्यावर मी शांत झालो. मनात चाललेली घालमेल काही वेळ थांबली. कार्यक्रम चालू व्हायला दहा मीनीट बाकी होती. मी स्टेज समोर कॅमेरा घेऊन थांबलेलो. तोवर मला माझ्या एका मित्राणे सांगीतले अरे तुला ती बोलवती आहे स्टेज पाठीमागे. पुन्हा मी घाबरत स्टेज पाठीमागे गेलो. आणि.......
तीच्या त्या हसत बोलेल्या वाक्यावर आजही मी आठवणीत आनंदात जगतोय
       एन.एस.एस कॅम्प संपला पुन्हा कॉलेज सुरु झालं. महिण्या भरात खुप काही बोलनं झालं अगदि Family background पासुन आवडी निवडी पर्यंत. तीच्या मनमोकळ्या स्वभावानं ती मला खुपचं आवडू लागली. आणि मी तीला प्रपोज करायच ठरवलं. सुरुवातीला तीन चार दिवस बोलायला जायचो घाबरायचो पुन्हा न विचारताच यायचो. पण एक दिवस निश्चय केला आणि कॉलोजला गेलो लेक्चर संपलं. शिक्षक बाहेर गेले. ती माझ्या शेजारच्याच बाकावर बसली होती. वर्गात गोंगाट चालू होता. तीला मी बोलवलं आणि तीला विचारलं "एखाद्या मुलीला प्रपोज कसा करतात". ती हसतं म्हणाली "मला नाही माहीत, अजून अशी वेळ माझ्यावर नाही आली. पण का रे कोण आवडलं तुला" असा उलट प्रश्न तीने केला. याच उत्तर न देता मीच पुन्हा विचारलं," एखादि मुलगी मुलावर केव्हा प्रेम करते" "जेव्हा जास्त वेळ तिच्याबरोबर बोलण्यात घालवतो त्यानंतर कदाचित"अस तिचं उत्तर होतं. पण कोण आवडली रे तुला सांग ना, सांग ना प्लिज अस बोलली. आयुष्यात प्रपोज करण्याची माझी हि पहिलीच वेळ होती. मला कळायचं बंद झाल होतं. शब्द उमटत नव्हते. हृदयाचे ठोके जोरात धडके घेत होते. ही वेळ मला घालवायची नव्हती."मला जी मुलगी आवडते, जिच्यावर मी खुप प्रेम करतो ती तुचं अस म्हणालो आणि........
त्या दिवसा पासुन आज पर्यंत तंब्बल दोन वर्षे झाली मी तीला पाहिलं ही नाही अ्न बोलनं तर लांबचं.....
    दोन वर्ष जीच्या फक्त आठवणीतचं घालवलीत. जीच्या स्वप्नात गेलीत. पुन्हा फक्त एक वेळ बोलण्यासाठी आणि भेटण्यालाठी दोन वर्ष आतून झूरत होतो. जीचा चेहरा बघण्यासाठी आज ही  तडफडत होतो. जीचा आवाज एैकण्यासाठी मी तरसलो होतो. जीच हसणं पाहण्यासाठी मी हवालदिल झालो होतो. आज प्रत्यक्षात ती समोर आली आणि दोन वर्ष चाललेली ही घूसमट थांबली. किंचीतसा ही बदल तीच्यात झालेला नाही. तीच सुंदर दिसनं, तीच बिध्दास्त बोलनं, तीच निख्खळं हसणं आजही जसंच्या तसं. काही मीनिटं बोलणं झालं. कॉलेजमध्ये असतानाचा तीच्या सोबतचा सहवास आठवला. ती गेली तरी  त्या आठवणीमध्येचं मी गुतूंन राहिलो.दोन वर्षाची चाललेली जिवाची ही धगधग काही क्षणात थांबली. ती आली. ती बोलली आणि ती गेली. जात असताना डोळे शांत ठेवून तिलाच बघतं होतो. पुन्हा कधी भेटेल? का आणखी दोन वर्ष वाट बघायला लागेल. याची रुकरुक अजून लागूनचं राहीली आहे
        - के.प्रफुल्ल

Friday, 1 January 2016

अलका कुबल चा पिक्चर....


भिलवडीत साधारण 1995 ला (अंदाजे) चारी बाजूंनी कापडाचं कंपाऊंड आणि दफन भूमीच्या शेजारी असलेला तंबू म्हणजे प्रकाश टॉकीज. त्या वेळची बारा वाड्यात एकचं असल्यानं प्रचंड फेमस होती. मराठी पिक्चर एखादा लागला त्यातल्या त्यात जर अलका कुबल च्या पिक्चर च पोस्टर जरी लागलं तर पिक्चर बघायला सबंध गाव बायका पोरासहीत लोटत होता. त्यावेळी अलका कुबल म्हटलं की सासु सुनांचं भांडण, सासु कडून सुनेचा छळ आणि त्यातून सासुच्या जाचापासुन सुटण्यासाठी सुनेची युक्ती यासाठी अलका कुबल फेमस होती. अलका कुबल ह्या नावासाठी पिक्चर बघायला बायांची गर्दी होत होती. मी चौथी पाचवीत असताना अश्याच एका पिक्चरला आई सोबत गेलो होतो. प्रकाश टॉकीज ला अलका कुबल, महेश कोठारे, शशीकला आणि सविता प्रभुने या स्टार कास्ट चा "लेक चालली सासरला" चित्रपट लागला होता. पिक्चर अलका कुबल चा असल्यानं शेजारच्या सार्या बाया लहान पोरांना घेऊन पिक्चर बघायला आल्या. तिकीट काडून तंबूत प्रवेश केला आणि टॉकीजच्या मध्यभागी शेजारच्या बायांचा एकगठ्ठा बसला. पिक्चर चालू झाला. त्या पिक्चर मध्ये पहिल्यांदा अलका कुबल दिसल्या नंतर म्हातार्या बाया माझी अलका म्हणून डोक्यावर बोटं मोडू लागल्या. त्या बायात आमची छबू आक्का पण होती. अलका कुबल जस पिक्चर मधलं कॅरेक्टर तस छबू आक्का हे पण एक मोठ कॅरेक्टर होतं. त्या पिक्चर मध्ये अलका कुबलचं लग्न महेश कोठारे सोबतं होतं. शशिकला महेश कोठारेची आई तर सविता प्रभूने महेश कोठारेची बहिण असते. पिक्चरच्या मंध्यांतरा नंतर महेश कोठारेच बाहेरचं प्रेम प्रकरण समोर येतं. तो एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात असतो. तीच्याशी लग्न करुन आपणही श्रीमंत व्हावं हे त्याला आणि त्याच्या आईला म्हणजे शशीकला ला वाटते. त्यासाठी पहिल्या बायकोचा म्हणजे अलका कुबल ला मारुन टाकण्याचा प्लान शशिकला आणि महेश कोठारे करत असतातं. ते सार पाहून छबू आका संताप करतं होती. तीचे दोन्ही डोळे पाणावले होते. मध्येच फुसफुसत होती. तोडांतल्या तोंडात महेश कोठारेला, त्याच्या आईला शिव्या देतं होती. अलका कुबल स्वयपाकघर मध्ये जाते. तिच्या पाठोपाठ महेश कोठारे आणि त्याची आई ही जाते स्वयपाकघर दरवाजा बंद करतात. काय करताय म्हणून अलका कुबल ओरडते तीचं ओरडनं एैकून छबू आक्का माणसांनी भरलेल्या तंबूत उभी राहीली. आईच्या सांगण्या वरुन महेश कोठारे अलका कुबल च्या अंगावर रॉकेल ओततो आणि तिला पेटवतो. अलका कुबेल ओरडे वाचवा वाचवा म्हणून मदत मागते पण तीच्या मदतीला कोणच येत नाही. आता मात्र छबू आक्कानं हंद्द पार केली उभारलेली छबू आक्का रडत जोरजोरात शिव्या देतं पडद्याकडे गेली. "मी नाही मरु देणार तुला. तीला मारु नका. तीला वाचवा वाचवा" म्हणून पडद्या सोबत झोंबू लागली.तीला कवटाळण्याचा प्रयंत्न करु लागली बांबूला बांधलेला पडदा बांबू सहीत खाली पडला आणि पिक्चर थांबला..
                                                                           -के.प्रफुल्ल

मुंबई, मुंबई.

आई मी मुंबईत सुखरुप पोहचलोय. तुला माहीतीय जशी टि.व्हीत मुंबई दाखवतात. तशीच ती धावती आहे. जिकडे बघेल तिकडे माणसंच माणसं आहेत. ती कधीच झोपतं नाहीय. रात्र अन् दिवस जागीच असते.
      सकाळी कॉलेज. दुपारी काम. रात्री कामावरुन घरी जाण्याची घाई. गंच माणसांणी भरलेली लोकल. दादर ते मुलूंड हा तीस मिनीटांचा प्रवास. मुंबईच्या या गर्दीतून सावरता सावरता  तुला फोन करायचा राहूनच गेला. मला माफ कर. मला माहीतीय तु नक्कीच जेवली नसणार. माझ्या काळजीत तु रडत ही असणार आहेस. अधीच मी एकुलता एक असल्यान तु मला मुंबईला शिकायलाही पाठवत नव्हती. मी मुंबईला शिकायला जाणार हे समजल्यावरच तु नाराज झाली होतीस. तू रडली ही होतीस. तु मला सारखी म्हणायचीस, "तु माझ्या पोटी एकटा अाहेस. माझ्या जीवात जीव असे पर्यंत मी माझ्या नजरे आड नाही करणार तुला. तुला जे काय करायच आहे ते गावातच कर. म्हणजे नजरेसमोर राहशील माझ्या". पण शर्यतीच्या धावत्या युगात तुझ म्हणनं पाठीमागे पडलं गं. मला नाही जमलं तुझ मन राखायला. कारण तुझ्या जन्मापासुन आलेल्या दारीद्र्याची  मला ही किव आली होती. आपण ही काहीतरी करावं आणि या संकटातून बाहेर पडावं अस वाटत होत. म्हणून मी मुंबईला येण्याचा हंट्ट धरला. आणि तो तु पुर्ण केलास. पण तुझ्या धाडसाला ही सलाम गं. जन्मापासुन पंचवीस वर्ष मला स्वतापासुन कधीच दुर केल नाहीस. आईच कर्तव्य तर पार पाडलसचं. बापाचंही प्रेम कधी  कमी पडू दिल नाहीस. शेवटी मी मुंबईला जाण्याचा आग्रह केला. तू नाराज होऊन का होईना पण मुंबईला जाण्यास परवानगी दिलीस. हिच तुझी खासीयत आहे.      
    लहाणपनापासुन आजवरचे सारे हट्ट तु पुरवलेस. तुला आठवतय जेव्हा मी लहान होतो. तेंव्हा मित्रांसोबत दिवसभर फिरायचो. घरी वेळेवर जेवायला नसायचो. तेव्हा तळमळीनं तु शोधायचीस. मी तुला खुप घाबरायचो. तुझ्या ओरडण्याचा आवाज माझ्या कानावर पडला की मी जिथे असेन तिथून तुझ्या समोर यायचो. तु ओरडायचीस. शिव्या द्यायचीस. मारायचीसही. मी जेव्हा रडायचो तेंव्हा पुन्हा मला मांडीवर घेऊन डोळे पुसायचीस. डोक्यावरुन हात फिरवायचीस. तुझा हा मायेचा हात जेव्हा डोक्यावरुन फिरेल तेंव्हा मी रडण थांबवून तसाचं झोपुन जायचो. कधी आजारी पडलो तर ताबडतोब दवाखाण्याची वाट धरायचीस. जोवर पुर्णपणे बरा होत नाही तोवर खुप काळजी घ्यायचीस. अगदी तळ हाताच्या फोडासारख जपायचीस. आज आजारी जरी पडलो ना तर तु नजरे समोर येतेस. आज हे सार कुठ तरी हरवल्यासारख वाटतय गं.
             -के.प्रफुल्ल