मुंबईतला पाऊस पहिला कि गावची आठवण होते. मी दहा बारा वर्षाचा असताना असाच पाऊस धो धो कोसळायचा. या पाऊसानं त्यावेळी असलेली मातीची घर कधी पूर्ण जामीन दोस्त व्हायची, तर कधी घराच्या भिंती पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर वाहू लागायच्या.
आमचं जुनं घर हि असच दगड मातीच आतून शेन मातीने सारवलेल. दोन छोट्या खोल्या. एका खोलीत कोपऱ्याला चूल. चुलीच्या बाजूला जळण ठेवायला छोटीशी जागा. लागून असलेल्या भिंतीला पाणी भरून ठेवलेल्या चार घागरी. पाठीमागच्या भिंतीला एक मोठी देऊळी. बाजूला तुटलेल्या फळ्यांच एक लाकडी कपाट. त्यात रचून ठेवलेली भांडी. या खोलीत दोन ते जास्तीत जास्त तीन माणसं बसली कि भरगचं दिसणार आमचं हे छोटसं स्वयपाक घर. याला आम्ही आतली खोली म्हणायचो.
दुसरी खोली म्हणजे बाहेरची खोली. वरच्या कोपऱ्यात दळायला जातं आणि त्याच्याच बाजूला जमिनीत पुरलेला उकळ. वरच्या बाजूला भिंतीत रोवलेली खुंटी. त्यावर लटकत असेली आजोबाची शबनम आणि दोनचार वायरीच्या पिशव्या. खालच्या कोपऱ्यात भिंतीला उभा करून ठेवलेला पाटा आणि त्याच्या वर ठेवलेला वरवंटा. त्याच्या वरच्या आडाला एक मोठी जाड तार गुंडाळलेली होती. खालून वाकवलेल्या तारेत पै-पाहुण्यांची पत्र आली कि वाचून त्या तारेत खोवून ठेवायची. एका भिंतीला तारेच्या वलानीवर अंथरून पांघरून असायचं. तर त्याच्या समोर असलेल्या भिंतीजवळ काठीच्या वलानीवर कपडे ठेवलेले असायचे. झाली आमची बाहेरची खोली. जेमतेम चार माणसं अवघडून झोपतील एवढीचं होती बाहेरची खोली.
तीन फुटी रुंद भिंतीं असूनही पाऊस पडायला सुरुवात झाली, कि आतल्या खोलीतल्या मागच्या भिंती पाठीमागे असलेल्या बोळात खूप पाणी साठायचं. पाण्याला पुढ जायला वाट नसायची म्हणून पाणी तिथेच मुरायचं. मग मुरलेल पाणी वाट काढत मागच्या भिंतीच्या देऊळीतून आत यायचं. आत आलेल्या पाण्याचा लोंढा इतका असायचा कि संपूर्ण घरात पाणीच पाणी असायचं. मागच्या देऊळीतून येणारं पाणी पुढच्या दरवाजातून बाहेर पडायचं. शेणाने सारवलेली जमीन पोपड धरायची. उकलायची. पावसाळ्यात भिजलेली घरातली जमीन सुकायला चार पाच महिने जायचे. खाली झोपायला टाकलेलं अंथरून ओलं होईल. म्हणून खतांच्या पोत्यांचा केलेला तळवट अंथरायचा आणि त्यावर झोपायचं.
काही वर्ष असाच पावसाळा अनुभवला. पुढच्या काही काळात आज्जी आजोबाला एक युक्ती सुचली होती. पावसाच्या पाण्याने संपूर्ण कुटुंबाला ओल्या जमिनीत झोपायला लागत होतं. चुलीत पाणी जायचं. जळण ओल व्हायचं. चूल पेटवताना जीव मेटाकुटीला यायचा. यापासून सुटका करायची म्हणून त्यांनी, ज्या देऊळीतून पाणी घरात यायचं. बरोबर त्या देऊळीच्या खाली भिंती लगत एक खडा काढला. देऊळीतून आत येणारं पाणी त्या खड्यात जायचं. जेंव्हा खडा भरेल तेंव्हा खड्यातलं पाणी चिंपाटान चेपलेल्या जुन्या बादलीत भरायचं आणि बाहेर फेकून द्यायचं. बादलीत भरलेल पाणी बाहेर टाकू पर्यंत पुन्हा खडा भरायचा. पुन्हा पळत जाऊन खड्यातलं पाणी भरायचं. ते बाहेर फेकायच. यातलं थोडं जरी टायमिंग चुकलं. तर घरभर पाणी झालचं म्हणून समजा.
पावसाळ्यात कित्तेक काळ हेच माझ काम होतं. घरात असेल तेंव्हा हि आणि शाळेतून घरी आल्यावर हि. खड्यातलं पाणी बादलीत भरायचं आणि बाहेर टाकायचं.
त्यानंतर २००५ साली महापुर आला आणि आमच जुनं घर जमीनदोस्त झाल.
© के.प्रफुल्ल