Saturday, 2 September 2017

नैराश्य

माणूस जगतं असताना दैनंदिन जिवनात त्याला वेगवेगळ्या घटनांना, वाईट प्रसंगांना, अडचणींना सामोरं जावं लागतं. काही माणसं अश्या घटनांना धाडसानं सामोरं जातात. तर काही घाबरुन टाळण्याचा प्रयत्न करतं. अश्या घटनांना सामोरं जाताना माणसाला नैराश्याचा सामना करावा लागतो. नैराश्य हे फक्त तरुण वयातच येतं असं नाही. कळायला लागलेल्या लहान वयापासुन ते मृत्यूपर्यंत माणूस नैराश्येच्या छायेत गुरफटलेला असतो. माणसाला वयाच्या या विविध टप्प्यात नैराश्येला सामोरं जावं लागतं. 
      एखादा कळता लहान मुलगा जेंव्हा एखाद्या गोष्टीसाठी आई वडिलांकडे हट्ट करतो. ती गोष्ट त्याला नाही मिळाली म्हणजे तो दु:खी होतो. निराश होतो. जे वय खेळण्या बागडण्याचं असतं त्या वयात काही मुलं बंद खोलीत बसून अहो रात्र अभ्यास करताना दिसतात. मग परिक्षेत एखादा गुण जरी कमी पडला तर लगेच निराश होऊन बसतात. काही माणसं आपल्या मुलांकडून इतका अभ्यास करुन घेतात. जेवढा त्यांनी आपल्या शैक्षणीक आयुष्यात कधीच केलेला नसतो. काही माणसं तुला डॉक्टर व्हायचय, इंजिनीयर व्हायचय म्हणून स्व:ता ची स्वप्न आपल्या मुलांवर लादत असतात. पण मुलांच्या मनाचा त्यांनी कधीच विचार केलेला नसतो. अशी माणसं आपल्या मुलांना स्पर्धेच्या युगात चालायला तर शिकवतात, पण जगायला नाही शिकवू शकतं. त्याला जिंकायची सवय लावतात. पण अपयश पचवायची नाही. म्हणून अशी मुलं एखादा गुण कमी मिळाला तरी निराश होतात. छोटसं ही अपयश पचवण्यची त्यांची कुवत नसते.
     तरुण वयात असणाऱ्या मुलां मुलींमध्ये प्रेम प्रकरणावरुन नैराश्य येण्याच प्रमाण आपल्याला खुप पहायला मिळतं. मुलीकडून किंवा मुलाकडून नकार मिळाल्याने मुलं मुली हताश होतात. निराश होतात. हि निराश्या अनेक मुलांना व्यसनाकडे घेऊन जाते. तर काही प्रेम प्रकरणातल्या नायक नाईकेला प्रेमभंग ही आयुष्यातली फार महत्वाची लढाई वाटतं असते. त्यात अपयश मिळवल्यामुळं काही तरुण मुलं मुली आत्महत्येचा पर्याय ही निवडतात. प्रौढ माणसं ही घरगुती किंवा वैयक्तीक कारणांमुळे, ऑफिसमध्ये वरीष्टांकडून मिळणाऱ्या वर्तणुकीमुळे, कर्ज अशा अनेक गोष्टीत सतत अडकलेली दिसतात. या कारणांमुळे ते निराश होतात. अशी माणसं दारु, सिगारेट अश्या व्यसनांना बळी पडलेली दिसुन येतात. तर वयोवृध्द माणसं सुध्दा घरगुती कारणांमुळे आणि आजारपणामुळे निराश्येत जगतं असतात.
      मग आपण जगत असताना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कारणाने निराश्या अनुभवलेली असते. जेंव्हा आपण निराश होतो. तेंव्हा आपल्याला समुपदेशाची गरज असते. आपण लहान असताना आपल्या अडचणी आपल्या आईवडीलांना सांगत असतो. तेंव्हा समुपदेशकाची भुमिका आपले आईवडील पार पाडतात. किंवा आत्ताही आपल्या कुटूंबातल्या छोट्या मुलांच्या अडचणी भाऊ, बहिण, आई, वडिल, आजी, अजोबा कोणी ना कोणी सोडवतं असतं. त्यामुळे हि लहान मुलं कधी निराश होताना  दिसतं नाहीत. हिचं मुलं जेव्हा तरुण होतात तेंव्हा समुपदेशकाची भुमिका पालकांएैवजी मित्र मैत्रीण पार पाडतात. पण मित्र मैत्रीण समवयीन असल्यानं त्यांचे सल्ले योग्य असतीलचं असं नाही. कारण ते ही या अश्याच अडचणीतून चाललेले असतात. एखादा तरुण तरुणी प्रेमात पडल्याचं किंवा प्रेमभंग झ्याल्याचं आईवडीलांना कधीचं सांगत नाहीत. त्याची कारणं ही बरीच आहेत. तेंव्हा तरुण वयातली मुलं मुली इथेचं भरकटतात. निराश होऊन वाईट मार्गाला लागतात. अश्या गोष्टी, घटना, अडचणी आईवडीलांसोबत व्यक्त करण्यची हिच योग्य वेळ असते. अश्या वेळी आईवडीलांनी मुंलांना रागवण्या, मारण्या एैवजी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं तर आपला मुलगा मुलगी वाया जाणार नाही. याची खबरदारी घेता येते आणि येणारी पिढी निराशयुक्त, व्यसनमुक्त व्हायला वेळ लागणार नाही.  
                                                                                                 -के.प्रफुल्ल

Friday, 25 August 2017

नातं- एक भावनिक गुंतागुंत!

     कोणताही माणूस इतर माणसांशिवाय एकटा राहू शकतो का? राहतं असेल तर कसा? स्त्री सोबत पुरुष, पुरुषा सोबत स्त्री, पुरुष पुरुष किवी स्त्री स्त्री ही सारी माणसं एकमेकांचं आयुष्य पुढं ओढायला हवे असतात. मग त्यांच नातं कोणतही असो. आई वडील, भाऊ बहिण, मित्र मैत्रीण किंवा नवरा बायको. प्रत्येकाकडे स्व:ताची एक मोकळी जागा असते. त्या मोकळ्या जागे मध्ये तो कोणाला नं कोणाला स्थान देतं असतो. आपण जगत असताना खुप सारी माणसं आपल्या आयुष्यात सतत येतं असतात. समाजातली माणसं. शाळा कॉलेज मध्ये भेटणारी नव नवी माणसं(मित्रमंडळी) ऑफिसातली माणसं. रोजच्या प्रवासात भेटणारी माणसं. दैनंदिन जिवणात दररोज भेटणारी माणसं. हि  सारी माणसं जसजशी आपल्या आयुष्यात येतात, तसं त्यांच्यासाठी आपण आपल्या आयुष्यात ती मोकळी जागा तयार करतो. त्यानां स्व:ताच्या आयुष्यात अनंन्य साधारण स्थान देतो. सतत भेटनं, बोलनं, एकमेकांच्या अडचणींना सोमोरं जानं या साऱ्यानं आपण एकमेकात गुरफटून गेलेलो असतो. पुढंं हिच माणसं आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग होऊन जातात. इतकं महत्व आपण काही माणसांना देतं असतो. हि माणसं आपल्या आयुष्यात शेवट पर्यंत असतात का? खरतर अशी माणसं आपल्या संपुर्ण आयुष्यात सोबतं असावीत असं आपल्याला वाटत असतं. पण काही माणसं कोणत्या नं कोणत्या कारणानं मधेचं सोडून वेगळे होतात. हि माणसं आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर त्याचा त्रास आपल्याला होत राहतो. त्यांच्या सोबत झालेल्या संभाषणामुळे, त्यांचा भेटींमुळे, त्यांच्या सवयींमुळे तो माणूस जरी आपल्या आयुष्यातून निघून गेला तरी तो कायमस्वरुपी आठवत राहतो. मग कालांतराने आपण स्वता:ला सावरु लागतो. या मध्ये बराचसा काळ लोटलेला असतो. सोडून गेलेल्या व्यक्तीची पुसटशी आठवण आपल्या मनात असतेचं. ती आठवण लवकर पुसली जात नाही. तरीही ती विसरण्याचा प्रयत्न आपण करु लागतो. मग सोडून गेलेल्या व्यक्तीची पोकळी कशी भरुन काढायची यासाठी पुन्हा एका अश्याचं माणसाची आपल्याला गरज लागते. याच गरजे पोटी आपण पर्यायी व्यक्ती शोधू लागतो. 
      माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातो म्हणजे नेमकं काय? समजा एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं प्रेम असेल किंवा चांगले मित्र असतील. त्याने तीच्याशी किंवा तीने त्याच्याशी अचानक बोलनं बंद केलं तर काय होईल? तीने किंवा त्याने तिच्याशी किंवा त्याच्याशी कायमचं बोलनं बंद केलं तर काय होईल? त्यांची माणसीक अवस्था काय होईल? हे बहुदा सर्वांनीचं अनुभवलं ही असेल. तसचं जर एखादा चांगला माणूस आपल्या आयुष्यातून निघून गेला. तर आपण मानसिक विकलांग होतो. मग सोडून गेलेल्या माणसाचा आणि आपला नातेसंबध काहीही असो. मित्र, मैत्रीण, मानलेला भाऊ, बहिण, आई, वडील, प्रियकर, प्रियसी किंवा जगातलं कोणतंही नातं असो. ही माणसं आपल्या आयुष्यातून गेल्यावर खुप मोठी पोकळी तयार होते. मग आपण अनेक मानसिक अवस्थेतून जात असतो. आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. माणसांपासून दुर रहावसं वाटतं. बंद खोलीत डांबून ठेवल्यासारखं एकटं रहावसं वाटतं. जगातल्या माणसांपासून दुर जावसं वाटतं. कारण सोडून गेलेल्या माणसाच्या आठवणी आपल्याला अस्वस्थ करत असतात. आपल्या मनातली घुसमट सोडून गेलेली व्यक्ती सोबत नसल्याची सतत जाणीव करुन देतं असतात.
       जेंव्हा अश्याच व्यक्ती आपल्या आयुष्यातून जात असतात तेंव्हा आपल्याला ही त्याचा मानसिक त्रास होऊ लागतो. मग आपल्याला एकटेपणा हवा असतो. कोणत्याच माणसांसोबत मिसळावस वाटतं नाही. आपण आणि आपलं काम एवढचं रममान जगतं जातो. पुढंं जगतं असताना पुंन्हा नव्या माणसांच्या भेटीगाठी होतात. पण ती माणसंं आपल्या जगण्याचा भाग होऊन जाईल इतकं स्थान त्यांना आपण आपल्या आयुष्यात देतं नाही. कारण भुतकाळातल्या अनुभवाने माणूस सोडून गेल्यावर होणारा त्रास आपण अनुभवलेला असतो. मग कामा पुरती माणसंं बाळगण्याची सवय कित्येक जणांना लागून जाते. जेंव्हा आपण आपल्या कामावर, अभ्यासावर, ध्येयावर लक्ष केंद्रित करतो, तेंव्हा आपण माणसांशिवाय जगू लागतो. तेंव्हा आपल्याला कळतं कि जगण्यासाठी आपल्याला कुठल्याही माणसाची गरज नाही. त्या घडीला आपण स्वतंत्र एकटे जगण्यास पात्र ठरतो.
         आपल्या ध्येया पर्यंत पोहचण्यासाठी आपल्या आयुष्यात माणसांची आवश्यकता आणि त्यांचा सहवास किती उपयोगाचा आहे. हे आपण स्व:ता ठरवनं गरजेचं आहे. समाजात वावरताना दोन प्रकारची माणसं आपल्याला नेहमी दिसतात. एक म्हणजे खुप मोठा नातेसंबध आणि मित्र परिवार असलेली माणसंं. आणि दुसरं म्हणजे कमी, मोजका मित्र परिवार असलेली माणसं. ज्या माणसाजवळ अनेक नातेसंबध, मोठा मित्र परिवार असतो, तो स्व:ता च्या दैनंदिन कामातून मिळणारा मोकळा वेळ सतत त्यांच्या अडचणी आणि गुंतागुंती सोडवण्यात घालवतो. पण ज्या माणसाजवळ नातेसंबध, मित्र परिवार मोजका, कमी असतो, त्याचा हा महत्वाचा उमदिचा वेळ तो स्व:ता ला देतो. स्व:ता चं ध्येय पूर्ण करण्यास देतो. या दुसऱ्या प्रकारची माणसं प्रत्येक क्षणी यशस्वी होतं असतात.
                                                                            
                                                                               © के. प्रफुल्ल

Wednesday, 16 August 2017

बलात्कार .. बलात्कारचं असतो!

कोपर्डी बलात्कार प्रकरणानंंतर महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. मराठा क्रांती मुक मोर्चा या नावाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले. "एक मराठा लाख मराठा" म्हणतं कोपर्डी बलात्कार प्रकरणी "नराधमांना फाशीची शिक्षा द्या" असा जनरेटा गावा गावातून येत होता. 28 सप्टेंबर ला सांगलीत ही मोठा मोर्चा निघाला होता. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लहान, थोर, तरुण, तरुणी, महिला, पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते.
     कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ सांगलीत निघालेल्या मोर्चा नंतर  सहा जानेवारीला याच जिल्ह्यात भिलवडी जवळ असलेल्या माळवाडी या गावात अल्पवयीन मुलीचा बलात्कार होऊन खून झाल्याची घटना समोर आली. या घटनेने गावासोबत सागंली जिल्हा हादरुन गेला होता. भिलवडी माळवाडी सारख्या उच्चभ्रू, सुशिक्षीत भागात अशी घटना घडणं म्हणजे लांच्छनास्पद होतं.
     बलात्काराची घटना समजल्यावर भिलवडी, माळवाडी तसेच आसपासच्या गावांनी या घटनेच्या निषेधार्थ गावं बंदची घोषणा केली. काही वेळात अासपासची गावं बंद झालीत. वॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून आसपासच्या शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. याच दरम्यान अफवांच उकळ फुटलेल होतं. घटनेची काहीच माहीती नसताना कोणीही काहीही अफवा पसरवत होतं. आरोपी दलित किंवा मुस्लिम असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर पसरवत होत्या.



      घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला भिलवडीत विविध सामाजीक संघटनांनी कँडल मार्च चं नियोजन केलं होतं. या मार्च मध्ये गावातल्या सगळ्या महिला पुरुषांनी सक्रिय सहभाग घ्यावा म्हणून रिक्षातून फिरुन पुकारलं जातं होतं. भिलवडीतल्या दलित वस्तीत येऊन बाबासाहेबांची शंपथ देऊन कँडल मार्च मध्ये सहभागी होण्यास सांगीतलं जात होतं. (खर तर त्यांना बाबासाहेबांची शपथ द्यायची गरज का लागली होती. याचं कारण अजून लक्षात येत नाहीय. दलित स्त्रीया बाकीच्या स्त्रीयांपेक्षा वेगळ्या आहेत का? आजवर दलित स्त्रीयांवर अत्याच्यार झाला नाही का? देशात बलात्कारांसारख्या घटना बौध्द वस्त्यात झालेल्या नाहीत का? बलात्कार करुन त्याचा खुन झालेल्या घटना त्यांनी एैकल्या, पाहील्या नाहीत का? एका मुलीवर अमानुष अत्याच्यार झाल्याचा दलित स्त्रीयांना काहीच फरक पडणार नाही. कारण ती परजातीची आहे. त्यांना अस म्हणायचं असेल का?) असो...
      पिडीत मुलीला अभिवादन आणि घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सात तारखेला सायंकाळी भिलवडीत कँडल मार्च निघाला. त्यात भिलवडी गावासह आसपासच्या गावातील महिला, पुरुष, तरुण, तरुणीनी (दलीत महिला, पुरुष, तरुण, तरुणी सह) सक्रीय सहभाग घेतला होता. हि घटना समोर आल्यापासुन पोलीस तपास यंत्रणा कामाला लागली होती. ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी असलेल्या चोपडे गोडाऊनमध्ये रोज काही संशयीतांना ताब्यात घेतलं जायचं आणि विचारपुस करुण सोडून दिलं जायचं. तिन चार दिवसात भिलवडी आणि परीसरातल्या दोनशे संशयीतांना ताब्यात घेतलं होतं. माळवाडी प्रकरण सोशल मिडीया, वर्तमानपत्र आणि टि व्ही न्यूज मुळे आता महाराष्ट्रभर गाजत होतं. बरेचसे राजकीय पुढारी मुलीच्या घरी सांत्वनाला येेत होते. जसं  पुढारी येऊ लागले तसं पोलीसांवरचा दबाव वाढतं होता. लवकरात लवकर या घटनेचा आरोपी गजाआड दिसेल. असं आश्वासन प्रत्येक पुढारी देत होता. सत्येत असलेल्या राजकीय पक्षावर विरोधी पक्षातले नेते आणि काही संघटना ताषेरे ओढत होते.
      पोलीस तपास यंत्रणा आता दिवस रात्र कामाला लागली होती. भिलवडी ते तासगाव आणि भिलवडीतून महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर महत्वाच्या ठिकाणी असणारे सी सी टी व्ही फुटेज तपासत होती. रात्रभर पोलीस वॅन भिलवडी आणि परीसरात फिरत होत्या. घटनेला पाच दिवस उलटून गेले होते. आरोपी अजूनही मोकाटचं होता. कोणताच पुरावा सापडतं नसल्यानं पोलीसांंनी शे-दोनशे लोकांना चौकशी करुन सोडून दिलं होतं. पण पाच दिवसानंतर आरोपी पकडला असून तो लवकरचं जनते समोर येणार आहे. अशी बातमी पसरली. आरोपी कोण आहे. हे जाणून घ्यायला  गावाची उत्कंठा वाढली होती.
 
        ज्या दिवशी आरोपी जाहीर करणार होते त्या दिवशी सकाळ पासुन भिलवडी पोलीस स्टेशन बाहेर तुफान गर्दी झालेली होती. आरोपी कोण असेल?  किती असतील? आरोपी आपल्या गावातलाचं आहे की परगावचा? असे बरेच प्रश्न त्या परीसरातल्या लोकांच्या डोक्यात घोंगावत होते. पोलीसानी जवळपास दोनशे संशयीतांची चौकशी करुन सहा दिवसानंतर आरोपीचा छडा लागला असून लवकरच जनते समोर येईल. अशी ग्वाही पत्रकार परीषदेत दिली होती. त्यानंतर दोन दिवसात म्हणजे 14 जानेवारीला आरोपी घोषीत केला गेला. त्या दिवशीच्या पत्रकार परीषदेत प्रशांत सोगटे हे आरोपीचं नाव जाहीर केलं. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात, टि. व्ही. बातम्यामध्ये प्रशांतच्या फोटो सह "आठ दिवसात मुसक्या आवळल्या" या हेडलाईनची बातमी महाराष्ट्रभर पोहचली. प्रशांत सोगटे हे नाव माझ्यासाठी आणि बऱ्याच लोकांसाठी नविन होतं. नविन एवढ्या साठीचं होतं की प्रशांत सोंगटेला हिमेश म्हणून ओळखलं जात होतं. त्याच्या प्रशांत सोंगटे या नावाशी जास्त जवळीकता कधी आली नव्हती. त्याचा वर्तमान पत्रातला फोटो पाहून माझीच मला किव वाटू लागली. कारण वर्तमान पत्रात आलेला फोटो मीच माझ्या एक पत्रकार मित्राला दिला होता.
       अनेकदा आरोपी पकडला तर "तो खरचं आरोपी असेल. त्यानेच हे कृत्य केलं असेल. त्याला फाशीची शिक्षा व्हावी.'' असं खुप वेळा लोकांना म्हणताना मी पाहिल होतं. पण प्रशांतच्या बाबतीत मात्र असं झालं नव्हतं. जेंव्हा प्रशातला आरोपी म्हणून जाहीर केलं होतं, तेंव्हा लोकं चिंतेत पडले होते. प्रशांतवर अंन्याय होतोय हे सरळ सरळ लोकांना दिसतं होतं. पोलीस यंत्रणेवरवरचा विश्वास नसल्याचं वातावरण पसरलं होतं. पण पोलिसांसमोर बोलण्याचं, ना त्यांना विचारण्याचं धाडस लोकांमध्ये नव्हतं. प्रशांत आरोपी असनं शक्य वाटत नव्हतं. त्याला बरीचशी कारणं देखील होती. ती कारणं सर्वसांमान्याच्या लक्षात ही येत होती.
     ती कारणं अशी होती. शवविच्छेदनाच्या अहवालात बलात्कार सामुहीक असल्याच सांगण्यात आलं होतं. मग एकट्या प्रशांतला आरोपी कसा घोषीत केला? बाकीच्या आरोपींना का पकडलं गेलं नाही? त्या आरोपींना राजकीय पाठबळ मिळतय का? आरोपी घोषीत केला. तर मग बलात्कार आणि हत्तेचा घटनाक्रम का जाहीर केला गेला नव्हता? बलात्कार केलेल्या अंतरापासुन मृतदेह सापडलेले अंतर जर दोन किलोमिटर असेल, तर एकट्या आरोपीने तो मृतदेह दोन किलोमीटर कसा आनला असेल? सी सी टी व्ही मध्ये दिसणारी संशयीत रिक्षा आणि रिक्षाचालक यांना अजून ताब्यात का घेतलं नाहीय? जर घोषीत केलेल्या आरोपीने म्हणजे प्रशांतने बलात्कार करुन खुन केला होता. तर तो कँन्डल मार्चला का हजर होता? त्याचा मनात कसलीच भिती नव्हती का? किवा बलात्कार करुण खुन केल्यावर तो पळून का गेला नाही? प्रशांतला दोन ते तीन वेळा चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुन्हा सोडून दिलं होतं. त्यावेळी त्याने पलायन का केले नाही? दोनशे संशयीतांच्या चौकशीत सामुहीक बलात्काराच्या घटनेत फक्त एकच आरोपी असु शकतो का? प्रशांत हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. या अगोद ही त्याच्यावर दोन खटले चालू होतेे. म्हणून हे क्रुर कृत्य त्यानेच केले असेल का? असे प्रश्न लोकांना पडतं होते.
 
       पोलीसांनी प्रशांतला न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीसांनी प्रशांतला अटक केल्यापासुन त्याचा भाऊ आणि वडिल रोज त्याला भेटायला जायचे. त्यावेळी तो वडिलांना म्हणायचा, "मी काहीच केलं नाही. तुंम्ही माझी काळजी करु नका. मी दोषी नाही. यांनी मला मारुन जरी टाकलं तरीही मी गुंन्हा कबुल करणार नाही. जो गुंन्हा मी केलाचं नाही तर का कबूल करायचा?" भावाला सांगायचा "काळजी घे आई पप्पाची." प्रत्येक भेटीच्या वेळेस सतत न घाबरता तो हेच बोलायचा. प्रशांतला ठोस पुरावा नसताना आरोपी म्हणून का घोषीत केला असेल? त्याचं कुटूंब परगावहून कामधंद्यासाठी माळवाडीत स्थलांतर झाल्यामुळे त्याच्या पाठीमागे कोणीही नाही म्हणून? राज्यातलं वातावरण कोपर्डी घटनेमुळे गढूळ झालेलं आणि पुन्हा या घटनेनं सामाजीक वातावरण दुषीत होऊ नये म्हणून? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुका तोंडावर आल्या होत्या. निवडणुकीवर काही दुष्परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांना प्रशांतला आरोपी घोषीत करावा लागला? काहीचं कळतं नाही. पण एखाद्या निर्दोष व्यक्तीला मृत्यूच्या दाढेत उभं करणं चांगली गोष्ट आहे का? ज्यावेळी त्याला आरोपी घोषीत केला तेंव्हा त्याची आणि त्याच्या कुटूंबाची काय अवस्था झाली असेल? त्याला लोखंडी गजाआड पाहून त्याच्या आईची, वडिलाची अवस्था काय झाली असेल? घटना घडण्या अगोदर त्याच्या कुटूंबाचं असणारं सामाजीक स्थान असचं कायम अबाधीत राहील का? त्याच्यावर आणि त्याच्या कुटूंबावर बलात्काराचा पडलेला हा शिक्का समाज पुसून टाकेल का? आपला समाज एवढा सुसंस्कृत आहे का?
                                                      - के.प्रफुल्ल

Wednesday, 11 January 2017

रिद्धी सिद्धी

  (केस स्टडी शुट करायला गेलो असताना....)
मुलगी जन्माला घालण्याबाबत अजूनही काही लोकांची मानसिकता इतकी वाईट असेल अस कधीच वाटतं नव्हतं.
    आई वडिलांना वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा होता. पण एकमेकांच्या शरीराला चिकटलेल्या बहिणी जन्माला आल्या. मुलगी जन्माला आली म्हणून वडील चिडले होतेचं. त्यात त्या एकमेकांच्या शरीराला चिकटलेल्या असल्यान अधीकच संतापले होते. अश्या चिकटलेल्या दोन मुली जन्माला आल्या असल्याचं शेजाऱ्यांना समजलं. "तुझ्या घरात देवीचा कोप झाला. म्हणून अश्या मुली जन्माला अाल्या." अस शेजारी वडीलांना बोलू लागले. मुली नको असलेल्या बापानं मुली हॉस्पीटलमधून घरी आल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मुंलीना जीवंत दफन करायचं ठरवलं. हृदय हेलावून टाकणारं हे प्रकरण जेंव्हा प्रथम संस्थेला समजलं. तेंव्हा पोलीसांच्या मदतीनं हस्तक्षेप करुन त्या मुलींना प्रथमने ताब्यात घेतलं आणि उपचारासाठी वाडीया चिल्ड्रन हॉस्पीटल मुंबई या ठिकाणी भर्ती केलं. 
      या दोघींना वेगळ करनं म्हणजे खुप मोठ आव्हान होतं. वाडीया हॉस्पीटल स्थापन झाल्यापासुनची अशी ही पहीलीचं केस होती. महत्वाचं म्हणजे अश्या चिंताजनक शस्त्रक्रियांमध्ये एकचं समस्या उद्भवली जाते. ती म्हणजे अश्या दोन चिकटलेल्या जिवांपैकी एखादा जिव गमवावा लागतो. अश्या भयावह परीस्थीतीत नाही नाही म्हणतं हे आव्हान वाडीया हॉस्पीटलने स्विकारलं. या शस्त्रक्रियेला खुप खर्च येणार होता. पण प्रथम आणि प्रथमसारख्या बऱ्याच सामाजीक संस्थांचा मदतीचा हातभार या शस्त्रक्रियेसाठी लाभला. शस्त्रक्रियेची तयारी सुरु झाली. मुंबई आणि मुंबईबाहेरील स्पेशलीस्ट डॉक्टर्स या ऑपरेशनसाठी बोलवण्यात आले. न्युरोलॉजीस्ट, हार्ट स्पेशलीस्ट, ब्रेन स्पेशलीस्ट, अर्थोपेडीक स्पेशलीस्ट, प्लास्टीक सर्जरी स्पेशलीस्ट अशा अनेक तज्ञ डॉक्टरांची फौज बोलवण्यात आली. शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. आठ महिण्याचे असताना एकमेकांना चिकटलेले दोन जीव वेगळे करायला सुरुवात झाली. डॉक्टरांपासुन हॉस्पीटलचा सर्व स्टाफ ही शस्त्रक्रिया सुखरुप व्हावी यासाठी प्रार्थना करतं होतं. तब्बल सात आठ तासांनी ही शस्त्रक्रिया संपली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आठ महिण्याचे हे दोन जीव एकमेकांपासुन वेगळे झाले. या चिमुकल्या हॉस्पीटलमध्ये जेंव्हा मृत्यूशी झुंज देत होत्या, तेंव्हा त्यांच्या आई वडीलांना कल्पना ही नव्हती आणि त्यांनीही मुली नेल्यापासुन त्यांची विचारपुस केली नाही. जन्मत:च या दोन जीवांना साधं नाव ही त्यांच्या निर्दयी आईवडीलांकडून लाभलं नाही. 
     हॉस्पीटल मध्ये असतानाच त्यांच नामकरण करण्यात आलं. हे दोन जीव आता रिद्धी आणि सिद्धी या नावाने ओळखले जातायत. हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यापासुन आता पर्यंत त्या तिथेच आहेत. त्यांच्या संगोपनासाठी प्रथमने एका केअर टेकर मावशींची नेमणूक केली आहे. त्यांच्या संगोपनाचा संपुर्ण खर्च प्रथम संस्थाच करते. आता रिद्धी आणि सिद्धी तिन वर्षाच्या आहेत. आतापर्यंत यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दोन बाकी आहेत.
      रिद्धी सिद्धी आता स्वतंत्र वाढत आहेत. वाडीया हॉस्पीटलच्या आवारात फुलपाखरासारख्या बागडत आहेत. आता त्या सामान्य मुलांप्रमाने पुढचं जीवन जगू शकतात. तीन वर्षाच्या या पोरक्या चिमुकल्यांना आता प्रथम सारखं मोठं कुटूंब लाभलय. 
  
                                   - के.प्रफुल्ल