Wednesday, 6 July 2022

पाऊस आणि घर

मुंबईतला पाऊस पहिला कि गावची आठवण होते. मी दहा बारा वर्षाचा असताना असाच पाऊस धो धो कोसळायचा. या पाऊसानं त्यावेळी असलेली मातीची घर कधी पूर्ण जामीन दोस्त व्हायची, तर कधी घराच्या भिंती पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर वाहू लागायच्या. 

आमचं जुनं घर हि असच दगड मातीच आतून शेन मातीने सारवलेल. दोन छोट्या खोल्या.  एका खोलीत कोपऱ्याला चूल. चुलीच्या बाजूला जळण ठेवायला छोटीशी जागा. लागून असलेल्या भिंतीला पाणी भरून ठेवलेल्या चार घागरी. पाठीमागच्या भिंतीला एक मोठी देऊळी. बाजूला तुटलेल्या फळ्यांच एक लाकडी कपाट. त्यात रचून ठेवलेली भांडी. या खोलीत दोन ते जास्तीत जास्त तीन माणसं बसली कि भरगचं दिसणार आमचं हे छोटसं स्वयपाक घर. याला आम्ही आतली खोली म्हणायचो. 

दुसरी खोली म्हणजे बाहेरची खोली. वरच्या कोपऱ्यात दळायला जातं आणि त्याच्याच बाजूला जमिनीत पुरलेला उकळ. वरच्या बाजूला भिंतीत रोवलेली खुंटी. त्यावर लटकत असेली आजोबाची शबनम आणि दोनचार वायरीच्या पिशव्या. खालच्या कोपऱ्यात भिंतीला उभा करून ठेवलेला पाटा आणि त्याच्या वर ठेवलेला वरवंटा.  त्याच्या वरच्या आडाला एक मोठी जाड तार गुंडाळलेली होती. खालून वाकवलेल्या तारेत पै-पाहुण्यांची पत्र आली कि वाचून त्या तारेत खोवून ठेवायची. एका भिंतीला तारेच्या वलानीवर अंथरून पांघरून असायचं. तर त्याच्या समोर असलेल्या भिंतीजवळ काठीच्या वलानीवर कपडे ठेवलेले असायचे. झाली आमची बाहेरची खोली. जेमतेम चार माणसं अवघडून झोपतील एवढीचं होती बाहेरची खोली.     

 तीन फुटी रुंद भिंतीं असूनही पाऊस पडायला सुरुवात झाली, कि आतल्या खोलीतल्या मागच्या भिंती पाठीमागे असलेल्या बोळात खूप पाणी साठायचं. पाण्याला पुढ जायला वाट नसायची म्हणून पाणी तिथेच मुरायचं. मग मुरलेल पाणी वाट काढत मागच्या भिंतीच्या देऊळीतून आत यायचं. आत आलेल्या पाण्याचा लोंढा इतका असायचा कि संपूर्ण घरात पाणीच पाणी असायचं. मागच्या देऊळीतून येणारं पाणी पुढच्या दरवाजातून बाहेर पडायचं. शेणाने सारवलेली जमीन पोपड धरायची. उकलायची. पावसाळ्यात भिजलेली घरातली जमीन सुकायला चार पाच महिने जायचे. खाली झोपायला टाकलेलं अंथरून ओलं होईल. म्हणून खतांच्या पोत्यांचा केलेला तळवट अंथरायचा आणि त्यावर झोपायचं.

काही वर्ष असाच पावसाळा अनुभवला. पुढच्या काही काळात आज्जी आजोबाला एक युक्ती सुचली होती. पावसाच्या पाण्याने संपूर्ण कुटुंबाला ओल्या जमिनीत झोपायला लागत होतं. चुलीत पाणी जायचं. जळण ओल व्हायचं. चूल पेटवताना जीव मेटाकुटीला यायचा. यापासून सुटका करायची म्हणून त्यांनी, ज्या देऊळीतून पाणी घरात यायचं. बरोबर त्या देऊळीच्या खाली भिंती लगत एक खडा काढला. देऊळीतून आत येणारं पाणी त्या खड्यात जायचं. जेंव्हा खडा भरेल तेंव्हा खड्यातलं पाणी चिंपाटान चेपलेल्या जुन्या बादलीत भरायचं आणि बाहेर फेकून द्यायचं. बादलीत भरलेल पाणी बाहेर टाकू पर्यंत पुन्हा खडा भरायचा. पुन्हा पळत जाऊन खड्यातलं पाणी भरायचं. ते बाहेर फेकायच. यातलं थोडं जरी टायमिंग चुकलं. तर घरभर पाणी झालचं म्हणून समजा.    

पावसाळ्यात कित्तेक काळ हेच माझ काम होतं. घरात असेल तेंव्हा हि आणि शाळेतून घरी आल्यावर हि. खड्यातलं पाणी बादलीत भरायचं आणि बाहेर टाकायचं. 

त्यानंतर  २००५ साली महापुर आला आणि आमच जुनं घर जमीनदोस्त झाल.  

                                                         © के.प्रफुल्ल 

  

Tuesday, 16 June 2020

मृत्यू आणि मी

कालचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप वाईट दिवस होता. या दिवसाची सुरुवात एका सफाई कामगाराच्या पत्नीच्या निधनाने झाली होती. हा तोच सफाई कामगार जो गावाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गावची घाण काढत होता. पण त्याला त्याच्या पत्नीला कॅन्सर सारख्या रोगातून बाहेर काढता आलं नाही. त्याच्या पत्नीची ट्रीटमेंट सांगलीच्या गांधी हॉस्पिटल पासून मुंबईत टाटा हॉस्पिटल पर्यंत केली होती. माझ्या व माझ्या मित्र परिवाराकडून शक्य तेवढे प्रयत्न आम्ही केले होते. पण दोन वर्षांपासून चाललेली ही झुंज अखेर संपली आणि काल ती कायमची मुक्त झाली.
     याच दिवसाची दुसरी घटना म्हणजे समाजातल्या एका व्यक्तीला चक्कर आली म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. विकनेस आला असल्यानं सलाईन लावण्यासाठी प्रयत्न केला असता डाॅक्टरांना त्याची हाताची शीर ही सापडत नव्हती. बी पी लेव्हल लो होत असल्याने त्यांना सांगलीच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितलं गेलं होतं. पण त्यांच्या कुटुंबात निर्णयक्षम माणसं नसल्यामुळे त्यांना डॉकटरांच म्हणणं पटल नाही. जेंव्हा मी आणि माझा मित्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना पहायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांनी सांगून दोन तास होऊन गेले होते. सकाळी चालत येऊन रिक्षात बसलेल्या पेशंटला आता उठून ही बसता येत नव्हतं. इतका विकनेस आला होता. पेशंट ची परिस्थिती पाहता आणि कुटुंबाची पेशंट बद्दलची आत्मीयता आणि नैराश्याची भुमिका पाहता मी आणि माझ्या मित्राने त्यांना सांगलीला न्यायचं ठरवलं. आम्ही त्या पेशंटला व्हीलचेअरवर बसवून ॲम्बुलन्स मध्ये नेताना पहीला अटॅक आला. पेशंटला अटॅक येत असताना मी त्यांची छाती जोर जोरात दाबत होतो. काही वेळात ते पुन्हा नॉर्मल स्थितीत आले. त्यांना पुन्हा व्हीलचेअरवर नीट बसवलं आणि डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर येई पर्यंत त्यांना दुसरा अटॅक आला. तेव्हाही त्याची छाती दाबत होतो पण तो त्यांचा शेवटचा अटॅक होता. त्याच अटॅक मध्ये पेशंट गेला. त्यांना व्हीलचेअरवर वरून पुन्हा बेडवर झोपवल. डॉक्टरांनी बीपी चेक केला. पेशंटच अंग पूर्ण थंड पडल होतं. जीव वाचवण्यासाठी पेशंटला ऍम्ब्युलन्सने सांगलीच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असताना स्ट्रेचर वर टाकून अँब्युलन्सने घरी न्यावं लागलं. या साऱ्या प्रक्रियेत पेशंटच्या घरचा एक ही व्यक्ती त्या पेशंटच्या आस पास ही नव्हता. असो. त्यानंतर तिसरा पेशंट. मग चौथा आणि नंतर पाचव्या पेशंटला भेटून रात्री एक वाजता घरी आलो. अशा या एका दिवसातल्या पाच वेगवेगळ्या पेशंट आणि घडलेल्या घटना.
     एक माणूस जिवंत असल्यापासून मरेपर्यंत चा प्रवास मी काल काही वेळेत पाहिला आहे. माणूस जगत असताना खूप साऱ्या चुका करतो. व्यसन ही त्यातली एक महत्त्वाची चूक आहे. अस मला वाटत. समाजात बरेच लोक व्यसनाधीन झाले आहेत. समाजात अश्या व्यक्तींना एका वेगळ्याच दृष्टीने पाहिलं जातं. व्यसन करणारा प्रत्येक व्यक्ती हा वाईट नसतो. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो हे खूप वाईट आहे. माझ्या घरात ही अशी व्यक्ती आहे. म्हणून ती व्यक्ती मरत असतानाही मी तिच्यासोबत न राहणं म्हणजे मी माणूस म्हणून जगण्याच्या लायक नाही. 
    आपल्या आजूबाजूला अनेक माणसं आहेत. ज्यांना दोन वेळचं अन्न ही मिळत नाही. जे छोट्या मोठ्या आजाराने त्रस्त आहेत. आर्थिक परिस्थतीमुळे ते उपचार ही घेऊ शकत नाहीत. यातली काही माणसं व्यसणाधीन नाहीत. तर काही व्यसणाधीन. जी माणसं व्यसनाधीन अधीन गेली आहेत. ती सारी माणसं जन्मजात व्यसनाधीन नाहीयेत. त्यांची परिस्थिती त्यांना व्यसनाकडे घेऊन गेली आहे. मी व्यसनाचा किंवा व्यसनाधीन माणसाचं समर्थन करत नाही. पण आपण आपल्या संवेदना जागृत ठेऊन अश्या ही व्यक्तीच्या मदतीला जायला हवं. तर आपण माणूस म्हणून जगायला पात्र आहोत. असं माझं प्रामाणिक मत आहे.

                          - के.प्रफुल्ल

Monday, 23 March 2020

स्वतःची ही काळजी घेऊया आणि इतरांची ही.

     दोस्तहो इटली सारख्या प्रगतशील देशात corona सारख्या आजाराने दिवसाला 600 ते 800 लोकांचा मृत्यू होतो. यामुळे हतबल झालेले  इटली चे  पंतप्रधान  Giuseppe conte हे रडतात. तर भारतासारख्या देशात corona रुग्णाचे प्रमाण दिवसा दिवसाला वाढत असून, संपूर्ण जग या आजाराच्या दहशतीखाली जगात आहे.


अश्या परिस्थितीत पंतप्रधानाच्या सांगण्यावरून आपण टाळ्या वाजवतोय. घोषणा देत ताट वाजवतोय. डिजे, बँजो लावून मिरवणूक काढतोय. यावर पंतप्रधानांना याच गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न पडतो.


   पंतप्रधानांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगण्या ऐवजी देशातल्या वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या सुविधा वाढवाव्यात. देशाची लोकसंख्या पाहता देशात एक लाख व्हेंटिलेटर ची उपलब्धता आहे. दिड कोटी लोकसंख्या असलेल्या देशात एक लाख व्हेंटिलेटर हा आकडा तुटपुंजी आहे. Corona सारख्या विषाणूची टेस्ट करण्यासाठी लागणाऱ्या टेस्ट लॅब वाढवण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसात भारतात कोरोना सारख्या विषाणूचे सावट आहे. सध्या प्रत्येक दिवसात जवळजवळ चाळीस ते पन्नास रुग्णांची वाढ होताना दिसून येते. यात महाराष्ट्राच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सध्याची परिस्थिती फार गंभीर जरी असली तरी महाराष्ट्रात सरकार तितक्याच काळजीपूर्वक ही समस्या हाताळत असताना दिसून येते.


     एकीकडे पोलीस अधिकारी समोर येऊन घरी बसण्याचे आव्हान करत आहेत. या विषाणूचा संसर्ग जर थांबवायचा असेल तर प्रत्येकाने घरी थांबण्याचे आव्हान ते करत आहे. तरी देखील आपण रस्त्यावर उतरुन डिजे लावून मिरवणुक काढणं हे भयंकर आहे.
      राज्यातले आणि देशातले डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ, पोलीस आणि सफाई कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून, कुटुंब बाजूला ठेवून आपलं कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत. यांच्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करण्या ऐवजी प्रशासनाने दिलेले आदेश पाळले तर घरात बसून या संसर्गला रोखण्यासाठी आपण त्यांची मदत करू शकतो.
काल रात्री बारापासून कलम 144 नुसार महाराष्ट्रात संचार बंदीचा आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी काढला आहे. आज जिल्ह्याच्या बॉर्डर बंद केल्या असून शक्य झाल्यास गावच्या बॉर्डर हि बंद कराव्या लागतील. एका गावातून दुसऱ्या गावात जाणं ही बंद होईल. या साऱ्या घटनांमुळे घाबरून न जाता शासनाच्या आदेशाचे पालन आपण सर्वांनी करावे. देशप्रेम घोषणा देऊन आणि राष्ट्रगीत म्हणून दिसून येतं, असं नाही. तर घरात बसून लोकांचे जीव वाचवून देश प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आपली सुरक्षा हिच जनतेची सुरक्षा.
                               ©️के.प्रफुल्ल

Tuesday, 24 September 2019

लगीनघाई

आईच्या टेन्शनमुळे लग्नाच्या विषयावर खूप दिवस झाले विचार करतोय. तिच्या म्हणण्यानुसार तिन चार मुली हि पाहिल्या होत्या. पण एकीने केस दाढी पाहून नकार दिला. दुसरीला आणि तिच्या घरच्यांना मी करत असलेले काम आवडलं नाहीचं आणि जे काम करतोय त्याच्यावर विश्वास बसत नाही म्हणून तिनेही नकार दिला. मुलीना काय आवडेल आणि काय नाही हे सांगता येत नाही. एका मुलीने मी गणपतीची पूजा करणार नाही म्हटल्यावर लगेच तिचा मेसेज आला. 'sorry. I am not interested to marry with u' मी रिप्लाय दिला Thanks. बर देवाचा विषय होता म्हणून ठिक. नाहीतर i am not virgin. मी sexually experienced आहे. ते हि पाच वर्षापूर्वी पासूनचं. हे जर वाक्य माझ्या तोंडून गेलं असतं तर तिने काय केल असतं काय माहित. आजकाल होणाऱ्या जोडीदाराला खर सांगितल तरी खूप प्रॉब्लेम असतो. आसो
आपलं नशीब फुटकं नाही. पण डेंजर आहे. शाळेमध्ये असल्यापासून मला प्रेमात पडायची खूप बेक्कार सवय आहे. शाळेतला क्रश नंतर कॉलेजमधला क्रश. पण हे प्रेम समोरून नसायचं. ते फक्त माझ्याकडूनच असायचं. एकतर्फी. त्यातच मी वाहून जायचो. डेरिंग करून मी एकीला प्रपोज हि केला. ती बया म्हटली 'मी कोण आहे माहितीय ना तुला? या एका वाक्यानं तीच्यातली आणि माझ्यातली आर्थिक आणि सामाजिक दरीच दाखवून दिली न राव.
मुंबईला शिकायला आल्यावर ही असचं क्रश व्हायचं. त्यातली एक खूपच आवडायला लागली म्हटलं तिच्यासोबत तर लग्न करता येईल म्हणून सुरुवातीला तिच्या सोबत मैत्री केली. वर्ष दिड वर्ष तिच्यासोबत बोलत राहिलो. तिला विचारलं. ती बोलली 'तू माझा मित्र आहेस. तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीही नाही.' पुन्हा सारं बारगळल.
ती नाही म्हटल्यावर बरेच दिवस मुली पाहण्याच्या कार्यक्रम थांबवला होता. आता आई हात धुन मागे लागलीय. पुन्हा मुली पहायला सुरुवात करावी लागणार आहे. तिला या वर्षा अखेरीस माझं लग्न करायचच आहे. खर तर माझी आई modern विचारांची असती तर मी लग्न न करता रिलेशन मध्ये राहणं पसंत केलं असतं. किंवा Contract marriage केलं असतं. पण माझी आई एवढ्या modern विचारांची नाहीय. ती अपेक्षा हि मी करू शकतं नाही. हा सारा माझा Background.
मी आता लग्नासाठी मुलगी शोधतोय. एकुलता एक असल्यान घरच्यांसाठी मला लग्न करणं गरजेच वाटतय. मी फ्रीलान्स फिल्ममेकिंग चं काम करतोय. पार्टनर कडून माझ्या मापक अपेक्षा आहेत. शिक्षित, समजूतदार असावी.देवधर्म करण्यापेक्षा माणुसकी जपणारी असावी. लग्नानंतर बायको म्हणून न राहता मैत्रीण म्हणून रहवी. माझ्या इतकच तेवढच तिला हि स्वातंत्र्य मिळेल. आणि हो मी जेवण बनवायला शिकतोय. वेळ मिळेल त्या वेळी जेवण हि बनवलं जाईल. जातीची अट नाही. other cast हि चालेल. मग शोधताय ना.

- के.प्रफुल्ल

Tuesday, 29 January 2019

जात आणि वास्तव

आजवर देशभरात उच्च वर्णिय बहुसंख्यांका कडून दलित अल्पसंख्यांकावर अन्याय अत्याचार होत आले आहेत. खैरलांजी - जवखेडा ते खर्डा पर्यंत आणि त्या अगोदर ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर संपुर्ण गाव एकत्र येऊन दलित समाजाला वाळीत टाकण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. सांगली जिल्ह्यातल्या बोरगावमध्ये सवर्णांनी दलितांची कुटूंब उध्दवस्त केल्याची घटना ही आपण जवळून पाहिली आहे. उच्चवर्णीयांकडून दलितांच शोषण केल्याच्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राला नव्या नाहीत. अश्यावेळी जिल्ह्यात पुन्हा एक घटना घडते. ही घटना दलित आणि इतर मागासवर्गीय कुटूंब,आणि त्यांनी वर्षानुवर्षे थाटामाटात सजवलेला संसार सारं काही मोडून काढते.
         सांगली जिल्ह्यातील माळवाडी गावात गेल्या वीस पंचवीस वर्षापासुन अतिक्रमण केलेल्या जागेवर दलित व इतर मागासवर्गातील लोक रहात असून शासन निर्णयानुसार ती जागा त्याच्या नावाने रितसर करुन देणे आवश्यक आहे,अशी मागणी त्या जागेवर राहणारे लोक कित्येक दिवस करत आहेत. पण गावातल्या सवर्णांना दलित इतर मागास लोकांनी शिक्षण, उद्योग, व्यवसायात केलेली प्रगती आता पहावेनाशी झाली आहे असे दिसते आहे. "रोज सकाळी उठल्यावर आंम्ही यांचच तोंड पहायचं का"? असं गावातल्या पुढाऱ्यांबरोबर उच्चवर्णीय लोकांना वाटतय. यांच्या झोपड्या इथून काढून टाका असं त्या ठिकाणी राहणारे उच्चभ्रु उच्चवर्णीय लोक, गावातले पुढारी म्हणत आहेत. त्यांच्या डोक्यावरचं छंप्पर काढण्यासाठी संपुर्ण गाव खांद्याला खांदा लावून एकत्र होतय. ही घटना सांगली जिल्ह्याला आणि पर्यायाने सबंध महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.
         खरचं जातीवाद संपला आहे का? की बदलत्या काळासोबत वेगळा चेहरा आणि वेगळ्या एडव्हान्स विषयांना घेऊन परत तोच संघर्ष उभा करावा लागणार आहे. छ. शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांनी जातीयता संपवण्यासाठी आपलं  सारं आयुष्य पणाला लावल. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मुल्ये समाजात रुजवून बाबासाहेबांनी लोकशाहीवादी भारतात निर्माण केला. पण खऱ्या अर्थाने देशातली लोकशाही यशस्वी ठरली आहे का? सर्व नागरिकांमध्ये समानता असावी त्यांना कायद्यामध्ये समानता असावी. महत्वाचं म्हणजे बहुसंख्यांकाचा अल्पसंख्यांकावर अत्याचार नसावा. तर ही लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. असं बाबासाहेबांचा लोकशाहीवाद सांगतो.
ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. ज्या महात्मा फुल्यांनी स्पृश्य-अस्पृश्य न पहाता सर्वाना पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली. ज्या बाबासाहेबांनी जातीवाद नष्ट करुन समतेचे बिज रोवले त्यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रातील अनेक गावं आज ही जातीवादाच्या जबरी विषाने रोज होरपळले जात आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे झाली आहेत. तरी देखील या देशातल्या दलितांवर, शोषितांवर गावखेड्यापासुन ते मोठमोठ्या शहरापर्यंत अन्याय अत्याचार होतचं आहेत. यावेळी मात्र मला आठवते, ती नामदेव ढसाळांच्या कवितेची ओळ 'स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे'.
                                                                                                           ©प्रफुल्ल कांबळे

Thursday, 13 December 2018

आजी

प्रत्येकाच्या आयुष्यात आजी नावचा एक सुगंध असतो. तो आयुष्यभर दरवळत राहतो. असाच सुगंध मलाही लाभला आणि माझ आयुष्य बदलत गेलं. मला जन्म जरी माझ्या आईने दिला असला तरी मी जिवंत असण्याचं एकमेव कारण म्हणजे माझी आजी आणि आजोबा. माझ्या जन्माच्या अगोदर पासुन माझ्या आजीला सायकॅट्रीकचा आजार असल्यानं माझ्या आजीच्या नावापुढ गावानं 'वेडी' हे एक विशेषनाम जोडलं होतं. जरी ती गावासाठी वेडी असली तरी एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, एक बहिण म्हणून आणि एक आजी म्हणून तिने तिची सर्व नैतीक जबाबदारी अगदी तंतोतंत पुर्ण पाडली आहे. दुसऱ्याच्या बांदावर रात्रंदिवस काम करत घर सांभाळण्यापासून ते चार मुलिंची लग्न करण्यापर्यंत आणि घर उभारण्यापासून ते माझा सांभाळ करण्यापर्यत सारी जबाबदारी पुर्ण पाडली. आजोबा गावातल्या गटारी साफ करायचे तर आजी शेतात पडेल ते काम करुन आजोबांच्या खांद्याला खांदा लावून सहा जनांच कुटूंब चालवायची.
माझा जन्मापासूनचं सांभाळ माझ्या आजी आजोबांनी केला असल्यान, स्व:ताच्या मुला एवढचं प्रेम त्यांनी माझ्यावर ही केलय. डोक्यावर फिरणारा मायेचा हात आणि उबदार कुस मला लहानपनापासून मिळालीय. कुटूंबात सर्वच कमी शिकल्यान मला उच्चशिक्षीत करण्याच स्वप्न माझ्या अशिक्षीत आजोबांनी पाहीलं होतं. पण त्यांनी पाहीलेल स्वप्न पुर्ण व्हायच्या अगोदरचं ते सोडून गेले. त्यानंतर काही वर्षांनी आजीची तब्बेत ही खालावत गेली.
मी शाळेत असताना जेंव्हा माझा आणि माझ्या आईचा वाद व्हायचा तेंव्हा मी न जेवताच शाळेला जायचो. तेंव्हा माझी आजी भर उन्हात डोक्यावर टॉवेल टाकून चालत  मला डबा घेऊन यायची. हायस्कुलच्या गेटवर रस्त्यावर उभ राहून हाक मारायची. ती हाक शाळेच्या शेवटच्या वर्गापर्यत  पोहचायची. एवढा कणखर तिचा आवाज होता. ती हाक एैकूण शिक्षक आणि विद्यार्थ्यांची  नजर खिडकीत जायची. मी जोवर तिच्याकडे जात नाही तोवर ती हाक देत रहायची. मी घरी जास्तवेळ जर तिला दिसलो नाही तर पुर्ण समाजभर हाक देत फिरायची. आघोळी पासून जेवणापर्यत सगळं करायची. जेंव्हा मुंबईतून मी घरी यायचो तेंव्हा माझ्या गळ्यात पडून रडायची आणि मी परत मुंबईला निघताना तिच्याकडचे दहा विस रुपये माझ्या हातात ठेवायची आणि गाडीत काहीतरी खा म्हणायची. इतकी काळजी ती करत होती. आजीच्या आणि माझ्या खुप साऱ्या गोड आणि कटू अश्या दोंन्ही आठवणी आहेत. त्या आठवणी शेवटपर्यंत तश्याच स्मरणात राहतील. कारण प्रत्येक आठवण माझ्या पुढच्या आयुष्याला उजाळा देत राहतील. माझं लग्न पहण्याची तिची खुप इच्छा होती. तीची ही एक इच्छा मी पुर्ण करु शकलो नाही. याचं मला खुप वाईट वाटतय.
आज ती नजरेआड झालीय. तिला वाचवण्याचा आंम्ही सर्वांनीच खुप प्रयत्न केला. जेंव्हा ती हॉस्पिटलाईज होती तेंव्हा तिच्या मरणयातना आंम्ही अनुभवत होतो. डॉक्टरांपुढे ही तिला  वाचवण्याचा कोणताच पर्याय उरला नव्हता. म्हणून घरी आणल्यानंतर आठदिवसांनी ती सोडून गेली. म्हातारपणात जेव्हा माणसाचं हाल पहावत नाही, तेंव्हा आपल्याच माणसाच्या मरणाची वाट आपण पहात असतो. पहाटेच्या ज्या पहिल्या अजानला ती उठायची त्याच पहिल्या अजानला तिने शेवटचा श्वास घेतला. शेवटच्या काही दिवसात तिच्या सोबतचे क्षण, तिचे स्पर्ष या साऱ्या माझ्या आयुष्यातल्या गोल्डन मेमरीज आहेत आणि कायम राहतील.
                                                                                                        - के. प्रफुल्ल

Monday, 11 June 2018

क्यूँ आज बात नही हुई?

किसी दिन जब तुमसे बात नहीं होती,
कुछ अजब-सा लगता है
उस दिन का हर एक पल|

सुखें हुए गुलाब के पत्तो की तरहा
लगती है हर एक शाम,  
और  सुनसान-सा लगता है 
जगमगाता सपनों का शहर ।

वो रात जो मुझे बेहद पसंद है
वो भी रुठ जाती है मुझसें 
अजनबी समझकर  ।

टुट जाते है सब 
सपने शिशे की तरहा
जो  पिछली रात  
देखे थे मैंने |

रो पडता है तब दिल मेरा और,
बार बार चिल्लाकर मुझसे यही पुछता है,
क्यूँ आज बात नही हुई?
क्यूँ आज बात नही हुई?

                           © रंजिश....(के.प्रफुल्ल) 
                             - 11/06/2018