Thursday, 13 December 2018

आजी

प्रत्येकाच्या आयुष्यात आजी नावचा एक सुगंध असतो. तो आयुष्यभर दरवळत राहतो. असाच सुगंध मलाही लाभला आणि माझ आयुष्य बदलत गेलं. मला जन्म जरी माझ्या आईने दिला असला तरी मी जिवंत असण्याचं एकमेव कारण म्हणजे माझी आजी आणि आजोबा. माझ्या जन्माच्या अगोदर पासुन माझ्या आजीला सायकॅट्रीकचा आजार असल्यानं माझ्या आजीच्या नावापुढ गावानं 'वेडी' हे एक विशेषनाम जोडलं होतं. जरी ती गावासाठी वेडी असली तरी एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, एक बहिण म्हणून आणि एक आजी म्हणून तिने तिची सर्व नैतीक जबाबदारी अगदी तंतोतंत पुर्ण पाडली आहे. दुसऱ्याच्या बांदावर रात्रंदिवस काम करत घर सांभाळण्यापासून ते चार मुलिंची लग्न करण्यापर्यंत आणि घर उभारण्यापासून ते माझा सांभाळ करण्यापर्यत सारी जबाबदारी पुर्ण पाडली. आजोबा गावातल्या गटारी साफ करायचे तर आजी शेतात पडेल ते काम करुन आजोबांच्या खांद्याला खांदा लावून सहा जनांच कुटूंब चालवायची.
माझा जन्मापासूनचं सांभाळ माझ्या आजी आजोबांनी केला असल्यान, स्व:ताच्या मुला एवढचं प्रेम त्यांनी माझ्यावर ही केलय. डोक्यावर फिरणारा मायेचा हात आणि उबदार कुस मला लहानपनापासून मिळालीय. कुटूंबात सर्वच कमी शिकल्यान मला उच्चशिक्षीत करण्याच स्वप्न माझ्या अशिक्षीत आजोबांनी पाहीलं होतं. पण त्यांनी पाहीलेल स्वप्न पुर्ण व्हायच्या अगोदरचं ते सोडून गेले. त्यानंतर काही वर्षांनी आजीची तब्बेत ही खालावत गेली.
मी शाळेत असताना जेंव्हा माझा आणि माझ्या आईचा वाद व्हायचा तेंव्हा मी न जेवताच शाळेला जायचो. तेंव्हा माझी आजी भर उन्हात डोक्यावर टॉवेल टाकून चालत  मला डबा घेऊन यायची. हायस्कुलच्या गेटवर रस्त्यावर उभ राहून हाक मारायची. ती हाक शाळेच्या शेवटच्या वर्गापर्यत  पोहचायची. एवढा कणखर तिचा आवाज होता. ती हाक एैकूण शिक्षक आणि विद्यार्थ्यांची  नजर खिडकीत जायची. मी जोवर तिच्याकडे जात नाही तोवर ती हाक देत रहायची. मी घरी जास्तवेळ जर तिला दिसलो नाही तर पुर्ण समाजभर हाक देत फिरायची. आघोळी पासून जेवणापर्यत सगळं करायची. जेंव्हा मुंबईतून मी घरी यायचो तेंव्हा माझ्या गळ्यात पडून रडायची आणि मी परत मुंबईला निघताना तिच्याकडचे दहा विस रुपये माझ्या हातात ठेवायची आणि गाडीत काहीतरी खा म्हणायची. इतकी काळजी ती करत होती. आजीच्या आणि माझ्या खुप साऱ्या गोड आणि कटू अश्या दोंन्ही आठवणी आहेत. त्या आठवणी शेवटपर्यंत तश्याच स्मरणात राहतील. कारण प्रत्येक आठवण माझ्या पुढच्या आयुष्याला उजाळा देत राहतील. माझं लग्न पहण्याची तिची खुप इच्छा होती. तीची ही एक इच्छा मी पुर्ण करु शकलो नाही. याचं मला खुप वाईट वाटतय.
आज ती नजरेआड झालीय. तिला वाचवण्याचा आंम्ही सर्वांनीच खुप प्रयत्न केला. जेंव्हा ती हॉस्पिटलाईज होती तेंव्हा तिच्या मरणयातना आंम्ही अनुभवत होतो. डॉक्टरांपुढे ही तिला  वाचवण्याचा कोणताच पर्याय उरला नव्हता. म्हणून घरी आणल्यानंतर आठदिवसांनी ती सोडून गेली. म्हातारपणात जेव्हा माणसाचं हाल पहावत नाही, तेंव्हा आपल्याच माणसाच्या मरणाची वाट आपण पहात असतो. पहाटेच्या ज्या पहिल्या अजानला ती उठायची त्याच पहिल्या अजानला तिने शेवटचा श्वास घेतला. शेवटच्या काही दिवसात तिच्या सोबतचे क्षण, तिचे स्पर्ष या साऱ्या माझ्या आयुष्यातल्या गोल्डन मेमरीज आहेत आणि कायम राहतील.
                                                                                                        - के. प्रफुल्ल